मनरेगातील कंत्राटी कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन

रत्नागिरी:-मनरेगा योजनेतील इतर समतुल्यपदाप्रमाणे मानधन व प्रवास भत्त्यात भरीव वाढ करावी या मागणीसाठी सोमवारपासून (ता. २१) कंत्राटी कर्मचार्‍यांनी कामबंद आंदोलन चालू केले आहे. मार्च अखेरच्या दरम्यान केलेल्या कामबंदचा निधी खर्ची टाकण्यावर परिणाम होणार आहे.

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत कंत्राटी सहाय्यक कार्यक्रम अधिकारी, कंत्राटी तांत्रिक सहाय्यक, कंत्राटी लिपीक कम डाटा एंट्री ऑपरेटर ही पदे योजनेचा मुख्य गाभा आहेत. या कर्मचार्‍यांना एनएमएमएस, सिमांकन, मोजमाप, मूल्यांकन करणे, सिसी करणे, ग्रामसभा, शीवारफेरी, आराखडे तयार करणे, मस्टर बनवून नोंदी करणे, आधार, बँक खाते नोंदविणे, इ-मेल, अहवाल, आढावा सभा यासह इतर कामाचे नियोजन करावे लागते. पंचायत समिती तसेच तहसिलस्तरावर प्रत्येक सभेला अहवाल देणे, वारंवार मीटिंग असे दोन्ही कार्यालयं सांभाळावी लागतात. मजुरांना गावातच काम उपलब्ध करून स्थलांतरण थांबविण्याचे कामही ते करतात. ग्राम पंचायतीचे अंतर जवळपास ४० ते ८० किलोमीटर असते, ही सर्व कामे करताना सुरवातीपासून ५ ते १० वेळा एकाच कामाला भेट द्यावी लागते. वाढलेली महागाई, पेट्रोलचे दर आम्हाला न परवडणारे आहेत. दर महिन्याला ६ ते ७ हजार रुपये खर्च करून कामे करण्यास प्रवास करावा लागतो. त्यामुळे हा खर्च मिळणार्‍या मानधनातून करणे परवडत नाही. कंत्राटी कर्मचार्‍यांना मिळणारे मानधन तुलनेत अत्यंत कमी आहे. महाराष्ट्राच्या भूमीतील ही योजना असून कर्मचारी इतर राज्याच्या तुलनेत अत्यल्प कमी मानधन वर काम करीत आहे. जवळपास १०-१४ वर्षांपासून कंत्राटी स्वरूपात शासनाकडे इमानेइतबारे सेवा देऊन आमच्या कार्यक्षेत्रातील मजूर कुटुंबांचे जीवनमान उंचावण्यासाठी आटोकाट प्रयत्न केलेले आहे. ग्रामीण भागातील सर्व मागासलेल्या कुटुंबांचे जीवनमान सुधारण्याचा प्रयत्न होत आहे. ग्रामीण भागातील मजूर कुटुंबांना योजना यशस्वीपणे राबविताना आमचा हातभार लागत आहे. राज्यात कोरोना आल्यापासून कित्येक कुटुंबांतील हाताला आमच्या जिवाची पर्वा न करता काम दिलेले आहेत. यात अनेक कर्मचारी कोरोना बाधित झाले होते. काहींना जीवही गमावावा लागला. अनेक कर्मचारी मानसिक आजाराने त्रस्त होत असून कुटुंबांचे पालनपोषण करण्यास तुटपुंज्या मानधनात परवडणारे नाही. याचा विचार करुन शासनाने निर्णय घ्यावा अशी मागणी मनरेगातील कंत्राटी कर्मचार्‍यांनी केली आहे. रत्नागिरी जिल्ह्यात ६५ कर्मचारी असून त्यांनी कामबंद आंदोलनात सहभाग घेतला आहे.