रत्नागिरी:- राजापूरात बिबट्याचे सुकवलेले कातडे बाळगणाऱ्या तिघांच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आले आहे. रत्नागिरीच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने ही कारवाई केली. राजापूर रेल्वेस्टेशन ते केळवली या दरम्यान बिबट्याचे आरोपींना अटक केली असुन या प्रकरणातील आणखी एकजण फरार आहे. दरम्यान पकडण्यात आलेल्या संशयीत आरोपींवर वन्य संरक्षण अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. बुधवार दिनांक ९ मार्च रोजी रत्नागिरीच्या स्थानिक गुन्हे विभागाने ही कारवाई केली.
बुधवारी यामध्ये रघुनाथ पांडुरंग चव्हाण (रहाणार ताम्हाने ता राजापूर) याला ताब्यात घेतले होते. यानंतर तपासात मिळालेल्या माहितीवरुन अजय शांताराम जाधव (रा. ताम्हाने ), नितीन धनाजी गुरव (रा. चुनाकोळवण) याना ताब्यात घेण्यात आले होते.
राजापूर पोलिसानी दिलेल्या माहितीनुसार या प्रकरणाशी संबंधीत प्रकाश गणपत मांडवकर हा एक संशयीत आरोपी फरार असुन त्याचा शोध घेण्याचे काम सुरु आहे. पकडण्यात आलेल्या संशयीत आरोपींविरुध्द वन्य संरक्षण अधिनियमन १९७२ च्या ४०,५१, ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील कार्यवाही सुरु आहे. या प्रकरणी महिला पोलीस उपनिरीक्षक श्रीमती एस . वेंगुर्लेकर अधिक तपास करीत आहेत .