तक्रार दाखल करायला जाणार्‍या व्यक्तीला मारहाण

खेड:- बँकेचा निरोप देण्यासाठी एका महिलेला केलेला फोन संबंधित महिलेकडे न देता परस्पर त्याच्या बायकोच्याच हातात दिल्याने दोघांमध्ये गैरसमज निर्माण झाले. त्यामुळे पती-पत्नीमध्ये गैरसमज निर्माण केल्याची तक्रार पोलीस स्थानकात गेले असता मारहाण करण्यात आली. ही घटना 26 फेब्रुवारी रोजी दु. 3.30 वा. च्या सुमारास घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धिरज सिताराम डाफळे (45, शिवखुर्द, खेड) यांनी आपल्यासोबत कामावर असलेल्या कर्मचारी महिलेला बँकेचा निरोप देण्यासाठी कॉल केला होता. हा कॉल संबंधित महिलेला न देता गणपत डाफळे (रा. शिवखुर्द) याने धिरज यांच्या पत्नीकडे नेवून दिला व सांगितले तुझा नवरा तुझे नकळत एका महिलेला फोन करतो असे सांगून पत्नी-पत्नीमध्ये गैरसमज निर्माण केला. याचा जाब धिरज यांनी गणपत यांना विचारताच शिवीगाळ करत दमदाटी केली म्हणून तुझ्याविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार देतो असे सांगून दुचाकीवरुन निघाले. यावेळी गणपत याने आपली इको गाडी रस्त्यात आडवी लावून रस्ता अडवला. व हातातील टॉमीने डोक्यात व उजव्या हातावर मारहाण केली. यात धिरज डाफळे हे जखमी झाले. त्यांनी खेड पोलीस स्थानकात फिर्याद दाखल केली. पोलिसांनी गणत विनय डाफळे याच्यावर भादविकलम 324, 341, 504, 506 अन्वये गुन्हा दाखल केला.