जयंत चव्हाण; डेंझर स्पॉट हटवून अपघात ५० टक्केपेक्षा कमी करणार
रत्नागिरी:- राष्ट्रीय महामार्गावरील किंवा अंतर्गत रस्ते अपघातांना प्रतिंबध घालण्यासाठी काही ठोस पावले उचलली आहेत. त्यासाठी तालुकानिहाय समित्या स्थापन करून ज्या भागात अपघात झाला आहे त्या भागाची समितीकडून पाहणी होईल. त्यानंतर संबंधित यंत्रणेकडून तात्पुरती किंवा कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात येणार आहे. यामुळे मार्गांवरील डेंझर स्पॉट कमी होऊन अपघातामध्येही घट होईल. जिल्ह्यातील अपघाताचे प्रमाण ५० टक्केपेक्षा कमी करायचा आमचा संकल्प आहे, अशी प्रतिक्रिया नूतन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी जयंत चव्हाण यांनी दिली.
आरटीओ चव्हाण यांनी पदाची सुत्रे हातात घेतल्यानंतर जिल्ह्याचा संपूर्ण आढावा घेतला. त्यानुसार त्यांनी जिल्ह्यातून जाणाऱ्या मुंबई-गोवा राष्ट्रीय आणि रत्नागिरी-कोल्हापूर या राज्यमार्गासह अंतर्गत रस्त्यांची माहिती घेतली. कोरोना काळात सर्वच जिल्ह्यात प्रवेशबंदी करण्यात आली होती. लॉकडाउन, जमावबंदी, संचारबंदी आदीमुळे वाहनांची वर्धळ कमी होती. त्यामुळे गेल्या दोन वर्षातील अपघाताचे प्रमाण कमी होते. अन्यथा मुंबई-गोवा हा राष्ट्रीय महामार्ग म्हणजे मृत्यूचा सापळा म्हणूनच ओळखला जात होता. त्यात महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सुरू असल्याने पावसात आणि त्यानंतरही अपघातांचे प्रमाण वाढले आहे. महामार्ग आणि अंतर्गत रस्त्यावरील अपघात रोखण्याचे एक मोठे आव्हान आहे. यापूर्वी देखील आरटीओ कार्यालयाकडून काही उपाययोजना झाल्या आहेत; मात्र नूतन आरटीओ जयंत चव्हाण यांनी जिल्ह्यातील अपघात रोखण्यासाठी काही ठोस पावले उचलली आहेत. जिल्ह्यात ज्या ज्या ठिकाणी गंभीर अपघात होऊन काही प्रवाशांना जीव गमवावा लागला आहे, अशा भागाची पाहणी करण्यासाठी तालुकानिहाय समिती स्थापन करण्यात येणार आहे. या समितीमध्ये संबंधित विभागातील सर्व अधिकाऱ्यांचा समावेश असेल. ही समिती घटनास्थळावर जाऊन त्या धोकादायक स्पॉटची पाहणी करतील. तेथे काही सुधारणा असतील त्या बांधकाम विभागाला सुचवतील. किरकोळ दुरुस्त्या लगेच केल्या जातील. कायमस्वरूपी दुरुस्ती असेल तर जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने त्यावर कार्यवाही केली जाईल. यामुळे डेंझर स्पॉट कमी होऊन अपघाताचे प्रमाणही कमी होण्यास मदत होणार आहे, असे चव्हाण म्हणाले. या वेळी सहाय्यक उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अजित ताम्हणकर उपस्थित होते.