४० हजार रुपये किंमतीच्या ट्रान्सफार्मरची अज्ञाताकडून चोरी

चिपळूण:-  नारदखेरकी गोंधळेवाडी जवळ पाणी पुरवठा विहिरीच्या जवळून नादुरुस्त असलेला ४०० किलो वजनाचा व ४० हजार रुपये किंमतीचा ट्रान्सफार्मर अज्ञात चोरट्याने दि. ४ जानेवारी दुपारी ४ ते दि. ११ जानेवारी दुपारी ३ वाजण्याच्या मुदतीत चोरुन नेला म्हणून चोरट्याविरुध्द काल गुरुवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सहाय्यक अभियंता विजय रावजी चव्हाण (३४, रा. वहाळ फाटा सावर्डे, महावितरण सावर्डे उपविभाग) यांनी तक्रार दिल्यानुसार सावर्डे उपविभाग अंतर्गत असुडॅ शाखेतील नारदखेरकी गोंधळेवाडी येथील पाणी पुरवठा विहीरीजवळ असलेला ट्रान्सफार्मर हा नादुरुस्त झाल्याने तेथे नवीन ट्रान्सफार्मर सप्टेंबरमध्ये बसविला व जुना ट्रान्सफार्मर काढून तेथेच खाली ठेवण्यात आला होता. दि. ४ जानेवारी रोजी दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास वायरमन राजेश रमेश महाडिक हे मीटर रिडींग घेण्यासाठी मोटारसायकलने जात असताना त्यांनी ट्रान्सफार्मर पाहिला होता. त्यानंतर दि. ११ जानेवारी रोजी वायरमन राजेश महाडिक व ठेकेदार अरिहंत एजन्सीमधील ६ कामगार नादुरुस्त असलेला ट्रान्सफार्मर आणण्यासाठी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास विहीरीजवळ गेले असता तेथे ठेवलेला नादुरुस्त ट्रान्सफार्मर दिसला नाही. मात्र ट्रान्सफार्मर ऑईल आणि  ट्रान्सफार्मरचे ४ नट जमिनीवर पडलेले दिसले. घटनेबाबत वायरमन राजेश महाडिक यांनी फोनद्वारे कळविले म्हणून दि. १२ जानेवारी रोजी दुपारी ४.१५ वा. चे सुमारास नारदखेरकी गोंधळेवाडी जवळ गेलो असता तेथे ट्रान्सफार्मर दिसून आला नाही, सदर ट्रान्सफार्मर चोरीस गेलेला असून त्याची किंमत ४० हजार रुपये असून ४०० किलो वजन आहे. या तक्रारीवरुन पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.