वडिलांनी केलेल्या बेदम मारहाणीमुळे चार वर्षीय मुलीचा मृत्यू; गुन्हा दाखल

रत्नागिरी:- स्वतःच्या चार वर्षांच्या मुलीला केलेल्या बेदम मारहाणीत तिचा दुर्देवी मृत्यू झाल्याची घटना मंडणगड तालुक्यातील बाणकोट येथे घटना घडली. याप्रकरणी बाणकोट सागरी पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बाणकोट येथील ईलीयास खेडेकर हे आपल्या कुटुंबियासोबत राहतात. त्यांना चार वर्षाची एक मुलगी आहे. खेडेकर यांनी चार दिवसांपूर्वी या चिमुकलीला काही किरकोळ कारणावरुन बेदम मारहाण केली. यावेळी मुलीला ढकलून दिले असता तिचे डोके भिंतीवर आपटले. यात तिला जबर दुखापत झाली.

गंभीर जखमी अवस्थेत तिला उपचारासाठी प्रथम डेरवण येथे नेण्यात आले. त्यानंतर पुढील उपचारासाठी रत्नागिरी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र आज, शनिवारी पहाटेच्या सुमारास तिचे निधन झाले. याप्रकरणी बाणकोट सागरी पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात येत आहे.