रत्नागिरी:- विद्युत ग्राहकांच्या तक्रार निवारणासाठी महावितरणमध्ये त्रिस्तरीय यंत्रणा कार्यरत आहे. वीजपुरवठा न करणे, पुरवठा खंडीत करणे, नवीन जोडणी, मीटरशी संबंधीत बाबी, वीजदेयकांशी संबंधीत बाबी, वा अन्य बाबत ग्राहक आपली तक्रार महावितरणच्या संबंधित शाखा/उपविभाग/विभागीय कार्यालयाकडे सादर करावे, असे आवाहन महावितरणतर्फे करण्यात आले आहे.
महावितरणच्या जिल्हा/मंडळ स्तरावर अंतर्गत तक्रार निवारण प्रणाली, परिमंडळस्तरावर ग्राहक गार्हाणे निवारण मंच व राज्यस्तरावर विद्युत लोकपाल अशी यंत्रणा आहे. राज्यात मुंबई (कोकण, पश्चिम महाराष्ट्र व खान्देश करीता) व नागपुर (मराठवाडा व विदर्भाकरीता) येथे विद्युत लोकपाल आहेत. ही यंत्रणा नैसर्गिक न्यायाच्या मुलभूत तत्वावर कामकाज करेल, ग्राहक हिताचे रक्षण करेल, ग्राहकांना हक्कांची माहिती देईल, ग्राहक तक्रारींचे निवारण सुकरतेने व त्वरेने करेल, असे विनियमात आहे. अंतर्गत तक्रार निवारण प्रणाली -महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या मंडळस्तरावर अंतर्गत तक्रार निवारण प्रणाली कार्यरत आहे. कार्यकारी अभियंता (प्रशासन) हे नोडल अधिकारी आहेत.
ग्राहक गार्हाणे निवारण मंच- महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या परिमंडळस्तरावर हा मंच स्थापित आहे. कोल्हापूर व रत्नागिरी परिमंडळासाठी कोल्हापूर परिमंडळस्तरावर हा मंच आहे. ग्राहक गार्हाणे निवारण मंच त्रिसदस्यीय आहे. विद्युत लोकपाल ही राज्यस्तरावरील यंत्रणा आहे. गार्हाणे निवारणासाठी ग्राहकांसाठी महत्वपुर्ण बाबी -महावितरणने वीजग्राहकांना तक्रारी मांडण्यासाठी मध्यवर्ती ग्राहक सुविधा केंद्राच्या माध्यमातून 24द 7 टोल फ्री क्रमांक 1800-102-3435, 1800-233-3435 उपलब्ध करून दिले आहेत. वीजपुरवठा न करणे, पुरवठा खंडीत करणे, नवीन जोडणी, मीटरशी संबंधीत बाबी, वीजदेयकांशी संबंधीत बाबी, वा अन्य बाबत ग्राहक आपली तक्रार महावितरणच्या संबंधित शाखा/उपविभाग/विभागीय कार्यालयाकडे सादर करावे. या कार्यालयात तक्रारीची सोडवणूक नाही झाल्यास, ग्राहकांना अंतर्गत तक्रार निवारण प्रणालीअंतर्गत आपल्या वीजसेवाविषयक विविध प्रकारच्या तक्रारी ऑनलाईन पध्दतीने नोंदविण्याची सोय महावितरणच्या ुुु.ारहरवळीलेा.ळप या अधिकृत संकेतस्थळावरील ग्राहक पोर्टलवर उपलब्ध करून दिली आहे.
अंतर्गत तक्रार निवारण प्रणालीअंतर्गत गार्हाणे दाखल झाल्यापासून कामकाजाच्या 3 दिवसांच्या आत ( वीज पुरवठा न करणे, जोडणी, पुनर्जोडणी किंवा वीजपुरवठा खंडीत करणे या संबंधित तक्रारी) आणि 15 दिवसांच्या आत (सर्व अन्य तक्रारींसाठी) निपटारा करणे आवश्यक आहे. मंच व विद्युत लोकपाल हे गार्हाणे दाखल झाल्यापासून 15 दिवसांच्या आत ( वीज पुरवठा न करणे, जोडणी, पुनर्जोडणी किंवा वीजपुरवठा खंडीत करणे या संबंधित गार्हाणे) आणि 60 दिवसांच्या आत (सर्व अन्य गार्हाण्यांसाठी) निकाल देतील. मा.विद्युत लोकपाल यांनी पारित केलेल्या आदेशाविरूध्द तक्रारदार व वितरण परवानाधारकास समुचित संस्थाकडे दाद मागण्याचा अधिकार आहे.









