रत्नागिरी:- मिनी मंत्रालय म्हणून ओळखल्या जाणार्या जिल्हापरिषदेच्या नवीन प्रशासकीय इमारतीसाठी निधी मिळवून देण्याचा अध्यक्ष विक्रांत जाधव यांच्या प्रयत्नांना यश आले आहे. या इमारतीला निधी मंजूर करणार असून त्याचे भुमीपूजनासाठी येणार असल्याचे उमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी रविवारी (ता. 26) रत्नागिरीत झालेल्या कार्यक्रमात त्यांनी जाहीर केले. या इमारतीसाठी विक्रांत यांचे वडील शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांनीही विशेष प्रयत्न केले.
रत्नागिरी जिल्हा परिषदेची पशासकीय कारभार सुरू असलेली तीन मजली भव्य इमारत जुनी झाली आहे. त्यामुळे या इमारतीला पर्याय म्हणून नवीन प्रशासकीय इमारत उभारणीसाठी विद्यमान सत्ताधार्यांनी पावले उचलली. ग्रामीण भागाच्या विकासाचा कणा मानल्या जाणार्या जिल्हा परिषदेच्या माध्यमातून अनेक विकासात्मक कामे, योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहचविल्या जातात. या इमारतीला कॉर्पोरेट लुक देण्यात येणार आहे. जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत इमारत बांधकाम आराखड्याचे सादरीकरण करण्यात आले होते.
बेसमेंट, तळमजला अशी सहा मजली नवीन इमारती बांधली जाणार आहे. मार्च 2022 मध्ये विद्यमान सदस्यांची मुदत संपुष्टात येणार आहे. त्यापुर्वी इमारतीसाठी निधी मंजूर करुन आणणार असे विक्रांत यांनी जाहीर केले होते. त्यासाठी जिल्हा परिषद अध्यक्ष विक्रांत जाधव यांनी काही दिवसांपूर्वी आमदार भास्कर जाधव यांच्यासमवेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. त्या भेटीतील चर्चेत या इमारतीसाठी निधी मंजूर करण्याची मागणी करण्यात आलेली होती. या मागणीची दखल रविवारी रत्नागिरी दौर्यावर आलेल्या उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी घेतल्याचे सांगितले. या इमारतीच्या भुमीपूजन कार्यक्रमासाठी येणार असल्याचे आमदार भास्कर जाधव यांना शब्द दिला आहे. यावेळी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनाही घेऊन येणार आहे. तसेच पालकमंत्री अॅड. अनिल परब, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत हेही त्यावेळी उपस्थित राहतील असे उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले.
जुन्या इमारतीच्या दुरुस्तीसाठीही निधी
जिल्हा परिषदेची सध्याची इमारती 1990 साली बांधण्यात आली होती. त्यानंतर दुरुस्तीसाठी एकही रुपया खर्च करण्यात आलेला नाही. त्या इमारतीच्या दुरुस्तीसाठी सहा कोटीचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला होता. एवढा निधी मिळणार नसल्याने नवीन चार कोटीचा प्रस्तावही तयार केला आहे. त्यामुळे या इमारतीसाठीही निधी मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. यासाठी अध्यक्ष विक्रांत यांनी पूर्ण ताकद पणाला लावली आहे.









