कोकण रेल्वे मार्गावर महिलेची पर्समधील 3 लाख 35 हजारांचा ऐवज लंपास 

रत्नागिरी:- कोंकण रेल्वे मार्गावरून धावणाऱ्या वसई ते सावंतवाडी नागरकोईल एक्स्प्रेसने प्रवास करणाऱ्या महिलेची पर्स लांबवून तब्बल ३ लाख ३५ हजार १०७ रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी अज्ञात चोरट्याविरुद्ध शहर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विजय श्रीधर नाईक (वय ५८, रा. बोरीवली पूर्व) हे कोकण रेल्वे मार्गावरील वसई ते सावंतवाडी असा नागरकोईल एक्स्प्रेसने १३ नोव्हेंबर रोजी प्रवास करीत होते. पहाटे ४.४५ वाजता ही ट्रेन रत्नागिरी रेल्वेस्थानकात थांबून ५ वाजता सावंतवाडी येथे जाण्यास निघाली. यावेळी सीट क्र. ६८ वर विजय यांची पत्नी पर्स आपल्या बाजूला ठेवून झोपली होती. त्याचवेळी अज्ञात चोरट्याने त्याचा फायदा घेऊन पर्स लांबवली.

यामध्ये अज्ञात चोरट्याने ३ लाख ३५ हजार १०७ रुपयांचा ऐवज चोरून नेला. याप्रकरणी विजय श्रीधर नाईक यांनी शहर पोलीस स्थानकात तक्रार दिली असून पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध भा.दं.वि. कलम ३७९ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास शहर पोलीस करीत आहेत.