आंबा घाट बंदचा परिणाम; २२ फेऱ्या लॉकडाऊपासून अद्याप बंदच
रत्नागिरी:- अनलॉक प्रक्रियेनंतर राज्यासह जिल्ह्यात एसटीची सार्वजनिक वाहतुक पुर्ण क्षमतेने सुरू झाली. मात्र रत्नागिरी जिल्ह्यातून कर्नाटकला होणाऱ्या दैनंदिन वाहतुकीला अद्याप ब्रेक लागला आहे. अतिवृष्टीमुळे जुलैमध्ये दरड कोसळल्याने आंबा घाट अवजड वाहनांसाठी बंद आहे. त्याचा कोल्हापूर मार्गावरील वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे. अणुस्कुरामार्गे कर्नाटकला एसटीगाड्या न्याव्या लागणात आहेत. वाढलेले इंधन, अंतर, वेळ व तिकिटाचे दर यामुळे एसटीने या मार्गावरील २२ गाड्या बंद ठेवल्या आहे. मात्र यामुळे प्रवाशांची प्रचंड गैरसोय होत असून खासगी वाहतुकीची सध्या चंगळ सुरू आहे.
कोरोना महामारीमुळे दीड वर्षे एसटीची सेवा बंद होती. त्यामुळे तोट्यात असलेल्या एसटीला याचा मोठा फटका बसला. अनलॉक प्रक्रियेनंतर टप्प्या-टप्प्याने लालपरीची सार्वजनिक वाहतुक सुरू झाली. राज्यातसह जिल्ह्यात आता १०० टक्के एसटी वाहतुक सुरू झाली आहे. मात्र रत्नागिरी एसटी विभागाला कर्नाटकातील लांब पल्ल्याच्या वाहतुक बंद ठेवावी लागली आहे. आंबा घाट बंद असल्याचा एसटीच्या अन्य वाहतुकीवर याचा परिणाम झाला आहे.
कर्नाटकासाठी रत्नागिरी विभागाच्या सुमारे २२ एसटी गाड्या सुरू होत्या. मात्र लॉकडाऊनपासून अद्याप ही सेवा बंदच आहे. कर्नाटक मार्गावरील वाहतूक बंद असल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे. अनलॉकनंतर राज्यांतर्गत बस वाहतुकीला परवानगी देण्यात आली आहे. मात्र अतिवृष्टीमुळे आंबा घाटातील मार्ग खचल्याने अवघड वाहतूक अजून बंद
आहे. रत्नागिरीतून-कर्नाटक मार्गावर व कर्नाटकातून रत्नागिरी मार्गावर दररोज धावणाऱ्या २२ गाड्या बंद आहेत. अद्याप दोन्ही राज्यांतील गाड्या बंद असल्याने प्रवाशांना खासगी वाहतुकीचा आधार घ्यावा लागत आहे. गेले सात महिने कर्नाटक मार्गावरील वाहतूक बंद आहे. प्रवाशांची प्रंचड गैरसोय होत आहे. रत्नागिरी विभागातून कर्नाटक राज्यात जाणाऱ्या बहुतांश गाड्या कोल्हापूरमार्गे जातात. रत्नागिरी आगारातून कोल्हापूर मार्गावर अणुस्कुरामार्गे अवघ्या सात गाड्या सुरू आहेत. अंतर, वेळ व तिकिटाचे दरात वाढ झाल्यामुळे फेऱ्या कमी केल्या आहेत.
अंतर वाढत असल्यामुळे कर्नाटक मार्गावरील बसेस सुरू झालेल्या नाहीत. मात्र, खासगी प्रवासी वाहतुकीला सुगीचे दिवस आले आहेत.
खासगी वाहतुकीचा आधार आंबा घाटमार्गे सहा चाकी, अवजड गाड्यांना वाहतुकीसाठी बंदी आहे. मात्र चारचाकी कार, जीप, ओमनी यासारख्या छोट्या गाड्यातून कोल्हापूर – रत्नागिरी मार्गावर खासगी प्रवासी वाहतूक सुरू आहे. सुरक्षित प्रवासासाठी एस. टी.कडे प्रवाशांचा ओढा असला, तरी अणुस्कुरामार्गे अंतर वाढत असल्याने तिकीट खर्चाचा भुर्दंड सोसावा लागत आहे. वेळ जास्त जात आहे. नाईलाजास्तव प्रवासी खासगी वाहतुकीकडे वळले आहेत.