चिपळूण:- कर्जाचे हप्ते न भरल्याची विचारणा केल्याचा राग मनात धरून कर्जदारासह चौघांनी जामीनदारास मारहाण केल्याची घटना पिंपळी खुर्द तीनवड गणेशनगर येथे शनिवारी दुपारी घडली. तसेच जामिनदाराच्या पत्नीच्या गळ्यातील मंगळसुत्र ओढून नेण्यात आल्याची तक्रार दिल्याने या प्रकरणी चौघांविरोधात चिपळूण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
या बाबतची फिर्याद प्रज्ञा प्रवीण कदम (३७, रा. पिंपळी खुर्द) यांनी दिली आहे. हरिश्चंद्र बाबाजी कदम, हर्षदा हरिश्चंद्र कदम, पूजा किशोर कदम, करिश्मा अर्जुन घाडगे (सर्व रा.पिंपळी खुर्द) अशी गुन्हा दाखल झालेल्या चौघांची नावे आहेत. प्रज्ञा कदम यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, फिर्यादी व गुन्हा दाखल झालेले चौघेजण एकमेकांचे शेजारी आहेत. आरोपीमधील हरिश्चंद्र यांनी शिवकृपा सहकारी पतपेढी भोगाळे चिपळूण या वित्तिय संस्थेमधून २ लाख रुपयांचे कर्ज घेतलेले आहे. फियादी प्रज्ञा कदम यांचे पती प्रवीण कदम हे जामीनदार आहेत. मात्र, हरिश्चंद्र कदम यांनी आजतागायत कर्जाचे हप्ते भरलेले नाहीत. यामुळे पतपेढीने प्रवीण कदम यांना थकित कर्जाची रक्कम तुमच्या पगारातून वसूल करुन घेऊ, अशी नोटीस पाठविली. या संदर्भात शनिवारी दुपारी प्रवीण यांनी हरिश्चंद्र कदम यांना कर्जाचे हप्ते भरण्यास सांगितले. याचा राग मनात धरुन हरिश्चंद्र यांनी प्रवीण यांना शिविगाळ केली व क्रिकेटच्या बॅटने मारण्यास अंगावर धावून आले तर हर्षदा, पूजा, करिश्मा या तिघांनी देखील प्रवीण यांना धक्काबुकी करीत मारहाण केली. तसेच फिर्यादी प्रज्ञा कदम यांना ओढून घेऊन जात असताना या चौघांपैकी कोणीतरी गळ्यातील मंगळसूत्र ओढून घेऊन गेल्याची घटना घडली आहे. यानुसार चौघांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. अधिक चिपळूण पोलिस करीत आहेत.