रत्नागिरी:- संगमेश्वर तालुक्यात पुन्हा एकदा गावठी बॉम्ब सापडल्याने खळबळ उडाली आहे. एकाचवेळी 162 गावठी बॉम्ब सापडले असून या बॉम्बचा वापर शिकारीसाठी केला जात होता की अन्य कोणत्या कारणासाठी याचा तपास पोलीस करत आहेत.
शिवधामापूर येथे एका मध्यप्रदेशातील व्यक्तीला जिल्हा दहशतवाद विरोधी पथक व बॉम्ब नाशक पथकाने जेरबंद केले असून या व्यक्तिकडून तब्बल 162 जिवंत गावठी बॉम्ब हस्तगत करण्यात आले आहेत. याप्रकरणी संगमेश्वर पोलीस अधिक तपास करीत आहेत. मागील दीड महिन्यात जिल्ह्यात गावठी बाँब मोठ्याप्रमाणात सापडण्याची तिसरी घटना उघड झाली असून त्यातील दोन घटना या संगमेश्वर तालुक्यातील आहेत. दसऱ्याच्या पूर्वसंध्येला ही कारवाई करण्यात आली.
जिल्हा दहशतवाद विरोधी पथक व बॉम्ब नाशक पथकाला संगमेश्वर तालुक्यातील शिवधामापूर येथे गावठी बॉम्ब घेऊन एक व्यक्ती येणार असल्याची माहिती मिळाली होती. गुरुवारी दहशतवाद विरोध पथकाने तातडीने या भागात सापळा रचला होता. शिवधामापूर गावच्या हद्दीत जंगल परिसरात असणार्या एका बंद शेत घराशेजारी संशयित व्यक्ती आल्याची माहिती त्यांना मिळाली. त्यानंतर पथकातील कर्मचार्यांनी या व्यक्तीला ताब्यात घेतले. चौकशीमध्ये ही व्यक्ती मध्यप्रदेशातील राहणारी असून त्याने आपले नाव आबस उर्फ कल्लू कथालाल बहेलिया असल्याचे सांगितले. त्याच्याकडे असणार्या बॉक्समध्ये बॉम्ब सदृश्य वस्तू दिसून आल्या, त्यामुळे तातडीने श्वान व बॉम्ब शोधक पथकाला या पथकाने पाचारण केले.गुरुवारी रात्री उशिरा हे पथक शिवधामापूरला पोहचले. याच दरम्यान, दहशतवाद विरोधी पथकाने याची माहिती वरिष्ठ अधिकारी व संगमेश्वर पोलीस स्थानकाला दिली. बॉम्ब शोधक पथकाने बॉक्समधील वस्तू या स्फोटक असल्याचे स्पष्ट केल्यानंतर कल्लू बहेलिया याला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले. हे जिवंत गावठी बॉम्ब डूकर व रानटी प्राणी मारण्यासाठी वापरण्यात येत असल्याची प्राथमिक माहिती पुढे आली आहे. परंतु यामुळे मानवी जिवितासही धोका निर्माण झाला होता. मानवी वस्तीमध्ये याचा स्फोट झाल्यास मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता होती. त्यामुळे संगमेश्वर पोलीस स्थानकात बहेलिया याच्याविरोधात गुन्हा दाखल करुन त्याला रात्री उशिरा अटक करण्यात आली.
रत्नागिरी जिल्ह्यामध्ये तो किती वर्ष अशा पध्दतीने बॉम्ब बनवून विकण्याचा व प्राणी मारण्याचा व्यवसाय करीत होता याची चौकशी पोलीस करीत आहेत. दरम्यान सप्टेंबरच्या पहिल्याच आठवड्यात संगमेश्वरमधील हरपुडे येथेही 18 जिवंत गावठी बॉम्ब सापडले होते. तर मंडणगडमध्ये दोनशेहून अधिक गावठी बॉम्ब सापडले होते. दीड महिन्यात गावठी बॉम्ब सापडण्याची ही जिल्ह्यातील तिसरी घटना आहे.