बँकेच्या व्यवस्थापकाला मारहाण प्रकरणी संशयितास अटकपूर्व जामीन मंजुर

रत्नागिरी:- रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या व्यवस्थापकास मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर संशयिताने जिल्हा सत्र न्यायालयात अटकपुर्व जामीनासाठी अर्ज केला होता. काल संशयित सुरेंद्र शशिकांत सावंत याला न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजुर केला आहे.

तालुक्यातील पाली येथे दि. २० सप्टेंबर २०२१ रोजी रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे व्यवस्थापक संजय मनोहर भालेकर रा. रत्नागिरी आपले कर्तव्य बजावत असताना पालीतील हाॅटेल लक्ष्मी समोर त्यांचे निमशासकीय कर्तव्य बजावण्यास त्यांना विरोध करुन हाताने मारहाण करुन शिवीगाळ व दमदाटी केली म्हणून सुरेंद्र शशिकांत सावंत रा. नाणीज याचेविरुद्ध तक्रार दिल्यावरुन भारतीय दंडविधान संहिता कलम ३५३, ३३२, ५०४,५०६ अन्वये रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता.

संशयित आरोपीने जिल्हा सत्र न्यायालयात अटकपुर्व जामीनासाठी अर्ज केला होता. त्यावेळी आरोपीच्यावतीने अ‍ॅड. सुयोग नंदकुमार कांबळे यांनी केलेला युक्तीवाद न्यायालयाने ग्राह्य धरुन आरोपीस अटकपूर्व जामीन मंजुर केला आहे.