रत्नागिरी:- फोन पे वरील कॅशबॅक रिवॉर्ड लागल्याचे सांगत तालुक्यातील वेतोशी येथील तरुणीकडून एटीएम पिन घेत 1 लाख 33 हजार 951 रुपयांची फसवणूक केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी ग्रामीण पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत नंदीनी लहू निंबरे (22, वेतोशी) या फसवणूक झालेल्या तरुणीने ग्रामीण पोलीस स्थानकात नितीन कुमार सिंग या अज्ञाताविरोधात तक्रार दाखल केली आहे. 11 सप्टेंबर रोजी हा प्रकार घडला. आरोपी नितीन कुमार सिंग याने फिर्यादीला फोन करुन, “मी फोन पे कंपनीकडून बोलत आहे,” असे सांगुन फिर्यादीचे मोबाईलवर स्वत:चे आय.डी.कार्ड पाठवले. यानंतर आरोपीत याने विश्वास संपादन करुन फिर्यादीला “फोन पे ॲप्लीकेशनमध्ये 4 हजार 999 रुपये कॅशबॅक रिवॉर्ड लागलेले आहे,” असे खोटे सांगितले. यानंतर फिर्यादी नंदिनी हिच्या मोबाईल हॅण्डसेटमध्ये एनी डेस्क रिमोट डेस्कटॉप सॉफ्टवेअर ॲप्लीकेशन डाऊनलोड करण्यास सांगुन त्या ॲप्लीकेशनचा कोड व फिर्यादीचे बॅक ऑफ इंडियाच्या ए.टी.एम पिन देण्यास सांगुन तो दिल्यावर फोन पे ॲप्लीकेशनमध्ये रजिस्टर केलेल्या फिर्यादीच्या बँक ऑफ इंडियाचे अकाऊंट मधून 1 लाख 33 हजार 951 रोख रक्कम फिर्यादीचे समंतीशिवाय स्वत:चे बँक खात्यामध्ये ट्रान्सफर करुन फिर्यादी यांची फसवणूक केली.