रत्नागिरी:- ऐन गणेशोत्सवात पावसाचा जोर कायम आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार अजुन तिन दिवस हा जोर कायम राहील अशी शक्यता आहे. यंदा हंगामाच्या सुरवातीपासूनच पाऊस व्यवस्थित आहे. त्यामुळे जिल्ह्यात पावसाने वार्षिक सरासरी ओलांडली असून सर्वच तालुक्यांमध्ये सरासरी तीन हजार मिलीमीटरपेक्षा जास्त नोंद झाली आहे.
जिल्ह्याची वार्षिक सरासरी ३,३६४ मिलीमीटर असून गेल्या १ जूनपासून आजपर्यंत जिल्ह्यात एकूण सरासरी ३४२४.९७ मिलीमीटर नोंद झाली आहे. मे महिन्यात तौक्ते चक्रीवादळामुळे मुसळधार पाऊस झाला. त्यानंतर जुनच्या पहिल्या आठवड्यापासून पावसाला सुरवात झाली. त्याचा जोर सातत्याने वाढतच होता. जुलैच्या मध्यात विक्रमी नोंद झाली होती. ऑगस्ट महिन्यात पावसाचा जोर ओसरला होता. दुसर्या पंधरवड्यात कडकडीत उनही पडले; परंतु पुढे पुन्हा पावसाने सुरवात केली. परिणामी प्रत्येक महिन्यात दरवर्षीच्या सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला आहे. सर्वच तालुक्यात यंदाच्या मोसमात आत्तापर्यंत तीन हजार मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस झाला आहे.
रविवारी (ता. 12) सकाळी ८.३० वाजेपर्यंतच्या चोविस तासात जिल्ह्यात सरासरी ३५.१३ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. त्यात मंडणगड ४०.२०, दापोली ४६.४०, खेड ५४.४०, गुहागर २९.८०, चिपळूण ४०.८०, संगमेश्वर २७.७०, रत्नागिरी १६.१०, लांजा २६.१०, राजापूर ३४.७० नोंद झाली. रविवारी दिवसभर पावसाळी वातावरण होते. अधुनमधून पावसाच्या सरी पडून जात होत्या. दुपारच्या सत्रात सुर्यदर्शन झाले; मात्र त्याचा प्रभाव थोडाचवेळ होता. हे वातावरण भातशेतीला पोषक असल्याचे बळीराजाकडून सांगितले जात आहे. मुसळधार पाऊस राहीला तर उत्पादनावर परिणाम होऊ शकतो. कडकडीत उन्हामुळे करप्याची भिती असते. १२० दिवसांची बियाणे तयार झाली असून वीस दिवसात ती कापणीयोग्य होतील. तोपर्यंत पावसाने विश्रांती घेतली तर त्याचा फायदा निश्चितच शेतकर्यांना कापणीची कामे आटोपण्यास होईल. १३० ते १३५ दिवसांच्या शेतीला अजुन महिन्याभराचा कालावधी शिल्लक आहे. त्यामुळे सध्याचा पाऊस पोषक ठरु शकतो, असे शेतकरी संतोष भडवळकर यांनी सांगितले.









