गुहागरच्या समुद्रकिनाऱ्यावर भलंमोठं जहाज; अखेर काही तासांनी गूढ उकलले!

गुहागर:-गुहागर तालुक्यातील समुद्रकिनाऱ्याजवळ एक भरकटलेलं जहाज आढळल्याने काल मंगळवारी सायंकाळपासून गूढ निर्माण झालं होतं. या जहाजाची लांबी जवळपास १५० फूट इतकी आहे. या जहाजाबाबत रत्नागिरी जिल्हा मेरीटाईम बोर्डाचे प्रादेशिक अधिकारी संजय ओगलमोगले यांनी माहिती दिली आहे.

हे जहाज ‘एल अँड टी’ कंपनीचं आहे. आरजीपीएल (वीज निर्मिती करणारी कंपनी) कंपनीशी संबंधित असल्याने यामध्ये कोणतीही हानीकारक वस्तू अथवा कर्मचारी नाहीत. ते मनुष्य विरहीत आहे. केवळ कामाचे सामान ठेवण्यासाठी हे जहाज आहे,’अशी माहिती संजय ओगलमोगले यांनी दिली आहे.

घाबरून जाण्याचं कोणतंही कारण नसून बांधलेला दोरखंड तुटल्याने ते जहाज किनाऱ्याजवळ आलं आहे, असं स्पष्टीकरणही ओगलमोगले यांनी दिलं आहे. समुद्रातील वारा आणि हवामान बदल हे लक्षात घेऊन संबंधित कंपनीकडून ते जहाज योग्य ठिकाणी हलवलं जाईल, तशा सूचना दिल्या आहेत, असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं.

हवामान खात्याने दिलेल्या इशाऱ्यानंतर सध्या कोकणात मुसळधार पाऊस कोसळत आहे. या पावसाचा फटका अनेक ठिकाणी बसला आहे. गुहागर शहरातील एका किनाऱ्यावर हे भले मोठे जहाज आढळले. हे जहाज मालवाहतूक करणारे असावे, असा अंदाज व्यक्त केला जात होता. त्यातच या जहाजाबाबत गुहागर तालुका स्थानिक प्रशासनाने कोणतीही माहिती देण्यास नकार दिल्याने हे गूढ अधिकच वाढले होते.