पूरग्रस्त भागात 38 आरोग्य पथके अजूनही तैनात 

रत्नागिरी:- जुलै महिन्यात चिपळूण आणि खेड पालिका क्षेत्र आणि जवळच्या भागात पूरस्थिती ओसरल्यापासून लगेच साथरोग नियंत्रणाची कामे सुरु करण्यात आली आहे. अद्यापही 38 आरोग्य पथकांच्या माध्यमातून उपाययोजना सुरु आहेत.

पूरस्थिती ओसरल्यावर साथीचे रोग पसरण्याची शक्यता दाट असते हे लक्षात घेऊन प्रशासनाने या ठिकाणी आरोग्य यंत्रणेच्या माध्यमातून  काम सुरु केले. यासाठी ठाणे, मीरा भाईंदर, मुंबई, पनवेल महानगर पालिकांनी देखील आपली पथके पाठवून या कामास मोलाची मदत केली आहे. डेंग्यू, लेप्टोस्पारसेसीस सारख्या रोगाची साथ पसरु नये यासाठी पाणी शुध्दीकरणासोबतच घरोघरी मेडिक्लोअर वाटप, जंतुनाशक फवारणी आणि ब्लीचिंग व फॉगींग सारख्या उपाय योजनांनी डासांचा उद्भवच होणार नाही, यासाठी मोठया प्रमाणावर प्रयत्न करण्यात आले. चिपळूण शहर व परिसरात सुध्दा तपासणी व औषधांचे वाटप सुरु असून 33 पथके कार्यरत आहेत. आतापर्यंत 63 हजार 273 नागरिकांची आरोग्य तपासणी केलेली असून  एकूण 110000 कॅप्सूलचे वाटप करण्यात आले आहे. एकूण 92 ठिकाणचे पाणी नमुने तपासणी करण्यात आली. खेड शहर व परिसरात सुध्दा तपासणी व औषधांचे वाटप सुरु असून 5 पथके कार्यरत आहेत.आता पर्यंत 4 हजार 675 नागरिंकाची आरोग्य तपासणी केलेली असून एकूण  6 हजार 192 कॅप्सूलचे वाटप करण्यात आले आहे. एकूण 46 ठिकाणचे पाणी नमूने तपासणी करण्यात आली.