रत्नागिरीतील बेकायदेशीर कॉलिंग सेंटरमधून झाले तब्बल 18 हजार कॉल 

रत्नागिरी:- बेकायदेशीर आंतरराष्ट्रीय कॉलिंग सेंटर प्रकरणी पोलिसांनी आणखी तिघांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात घेतले. त्यामध्ये सिप ट्रंकिंग सिस्टीम व संगणक कार्यान्वीत करणाऱ्याचाही समावेश आहे. तपासात मिळालेल्या राउटरमधून १८ हजार कॉल झाल्याची आणखी एक धक्कादायक माहिती पुढे आली आहे. त्यामुळे प्रकरणाचे गांभीर्य आणखी वाढले आहे. पोलिस याची सखोल चौकशी करीत आहेत. 

बेकायदेशीर कॉलिंग सेंटरमधून सिप ट्रंकिंग सिस्टीम व संगणकाचा वापर करुन मस्कत, कतार, सौदी, कुवेत, ओमान आदी आखाती देशातुन रत्नागिरी कॉल आल्याचे निष्पन्न झाले आहे. दोन दिवसांपूर्वीच ताब्यात घेलेल्या संबंधित मोबाईल कंपनीच्या राउटरचावरून १८ हजार कॉल झाल्याचे सीडीआरवरून निष्पन्न झाले आहे. हे कॉल आखाती देशाबरोबर अन्य कोण-कोणत्या देशात करण्यात आले आहे. रत्नागिरी कोणाच्या संपर्कात होते आणि संपर्कात असणारे कोण होते, याचा तपास पोलिस करीत आहे. त्याअनुषंगाने जिल्हा पोलिस अधीक्षक  गर्ग यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे. दहशतवादी विरोधी पथकाच्या येथील शाखेचे अधिकारी, शहर पोलिस आणि गुन्हे शाखा यांच्यामार्फत हा संयुक्त तपास सुरू आहे. याबाबत माहिती देताना पोलिस यंत्रणेलाही काही मर्यादा येत आहेत. 

मात्र अटक करण्यात आलेल्या संशयितांकडुन खोटी माहिती दिली जात आहे. त्यामुळे पोलिसांना तपासात अडथळे येत आहेत. त्यावर मात करीत पोलिसांचा तपास सुरू आहे. आज आणखी तिघांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले. त्यामध्ये या बेकायदेशीर कॉलिंग सेंटरवर सिप ट्रंकिंग सिस्टीम कार्यान्वीत करणाऱ्यालाही चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडे ही सिस्टीम खरेदीसाठी कोण कोण गेले होते, याची माहिती घेण्यासाठी पोलिसाना आता धागेदोरे मिळण्याची शक्यता आहे.