रत्नागिरी:- हायस्पिड इंटरनेटद्वारे सिप ट्रंक सिस्टिमार्फत देशासह परदेशात संपर्कासाठी कॉलिंग सेंटर चालवणार्या टोळीच्या मास्टर माइर्ड फैजल रज्जाक अली रज्जाक सिद्दीकी याच्यासह मोबाईल शॉपी मालक अलंकार अरविंद विचारे याला दि. १७ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. फैजलच्या परदेशातील कनेक्शनवर पोलीसांनी लक्ष केंद्रित केले आहे. कोणकोणत्या देशात फैजल संपर्कात होता. त्याने सर्व्हर लावण्यासाठी रत्नागिरीची निवड का केली? याचा शोध पोलीस घेत आहेत. तर फैजलच्या मुंबईतील सेंटरची तपासणी करण्यासाठी पोलीसांचे पथक मुंबईत दाखल झाले आहे.
रत्नागिरी शहरातून हायस्पिड इंटरनेटद्वारे इंटरनॅशनल कॉल होत असल्याचे मुंबई एटीएसला तंत्रज्ञानाच्याद्वारे समजले होते. त्यांनी माहिती रत्नागिरी दहशदवाद विरोधी पथकाला कळविली. यानंतर आठवडा बाजार येथील मोबाईल दुकानात पोलिसांनी धाड टाकली. इंटरनॅशनल कॉलिंग सेंटर चालविण्यासाठी आठवडा बाजार येथील श्रीटेक दुकानाचे मालक अलंकार अरविंद विचारे यांच्या दुकानात कॉलिंगचा सर्व्हर बसवण्यात आला होता. या सर्व्हरवरूनच इंटरनॅशनल कॉलिंग सुरू होते. हे सर्व तो कसा ऑपरेट करत होता. याची माहिती पोलीस घेत आहेत. संबधीत कंपनीकरुन कॉलिंगचा डाटा मिळाल्यानंतरच यातील अनेक गोष्टी उघड होण्याची शक्यता आहे.