चिपळूण:- चिपळूण मध्ये जी पूर परिस्थिती निर्माण झाली त्याला सर्वस्वी जिल्हा प्रशासन जबाबदार असल्याचा घणाघाती आरोप जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आणि गुहागरचे आमदार भास्कर जाधव यांनी केला आणि संबंधित पूरग्रस्तांची एक प्रकारे दुःख त्यांनी वस्तुस्थितीसह बैठकीत मांडले. चिपळूण मधील पंचायत समितीच्या सभागृहात शनिवारी चिपळूणमधील व्यापार्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती.
त्या बैठकीला उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत, खासदार विनायक राऊत, आमदार राजन साळवी, आमदार शेखर निकम, माजी आमदार सदानंद चव्हाण, कोकण आयुक्त विलास पाटील, उपजिल्हाधिकारी संजय शिंदे आदींसह व्यापारी वर्ग उपस्थित होते.
यावेळी भास्कर जाधव यांनी आपल्या संतप्त भावना व्यक्त करताना उदय सामंत व खासदार विनायक राऊत त्यांच्याकडे काही क्षण पहातच राहिले. आमदार भास्कर जाधव यांनी सभेला मार्गदर्शन करताना आज चिपळूणकर वार्यावर असल्याचे सांगितले आणि कुठे आहे प्रशासन असे सांगून अक्षरशः प्रशासनाचे वाभाडे काढले. चार दिवस उलटूनही पूरग्रस्तांना न्याय मिळत नसल्याने तसेच कोणत्याही प्रकारचे नियोजन करण्यात न आल्याने आमदार भास्कर जाधव यांना आपल्या भावना अनावर झाल्या आणि त्यांनी चिपळूणवासियांच्या वतीने आपल्या संवेदना व्यक्त केल्या. आमदार भास्कर जाधव यांच्या आरोपानंतर तरी आता चिपळूणकरांना न्याय मिळेल, असे बोलले जात आहे.
दरम्यान, ना. उदय सामंत, खासदार विनायक राऊत यांनीही प्रशासनाच्या कारभाराबाबत नाराजी व्यक्त करीत सर्व काही सुरळीत होईल, असे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना देत त्यांना तातडीने अंमलबजावणी करण्यास सांगितले. जिल्हा प्रशासनातील अधिकारी आहेत कुठे, कुठेही दिसले नाहीत या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली. हवामान खात्याकडून चार दिवसांपूर्वी इशारा आलेला असतानाही संबंधित प्रशासनाने कोणतीही खबरदारी घेतली नसल्याचा गंभीर आरोप आमदार भास्कर जाधव यांनी केला. काही अधिकाऱ्यांवर कारवाई होणे गरजेचे आहे. कुठले अधिकारी आज चिपळूण मध्ये कुठेही दिसले नाहीत. बैठका घेऊन प्रश्न सुटत नाहीत, प्रत्यक्ष लोकांना मदत करण्यासाठी फिल्डवर जाऊन मदत करणे आवश्यक आहे. पोसरे येथील बौद्ध वाडी दरड कोसळली त्यातले तीन मृतदेह ग्रामस्थांच्या मदतीने बाहेर काढण्यात आले. पण प्रशासनाचा किंवा एनडीआरएफ कडून कोणतीही उपाय योजना या ठिकाणी दिसून आली नाही. नगरपालिकेकडून किंवा पोलिसांकडून इशारा देण्यात आलेला नव्हता तो दिला असता तर चिपळूण शहरवासीय सतर्क राहिले असते आणि पाणी वित्तहानी काही प्रमाणात कमी झाली असती. मुळातच नियोजनाचा अभाव यावेळी दिसून आला. नगरपालिकेचा होड्या इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्रात ठेवल्या होत्या, इंजिन नगरपालिकेचा कार्यालयात होते. हा कुठला प्रकार असा सवालही भास्कर जाधव यांनी विचारला. अधिकाऱ्यांची मानसिकता काम करण्याची नाही त्यामुळे केवळ आणि केवळ प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळेच चिपळूण मधील पूर परिस्थिती ओढावली असा गंभीर आरोप करुन अधिकाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी जाधव यांनी केली