रत्नागिरी:- कोरोनामुळे रोजगार गमवणार्या अनेकांना गावातल्या गावात राष्ट्रीय ग्रामीण रोजगार अभियानांतर्गत (मग्रारोहयो) हाताला काम मिळाले. कोरोना कालावधीत जिल्ह्यात 1 लाख 90 हजार 832 मनुष्यदिन निर्मिती झाली. विविध कामांवर 5 कोटी रुपयांचा निधी यावर खर्ची पडला आहे.
गावातल्या गावात लोकांना काम मिळावे यासाठी शासनाने मग्रारोहयो योजना राबविण्याचा निर्णय घेतला. यामध्ये दिवसाला 248 रुपये रोज दिला जातो. यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील 4 लाख 10 हजार 113 लोकांनी ऑनलाईन नोंदणी केलेली आहे. कोरोनामुळे गेली सव्वा वर्षे परिस्थिती गंभीर बनलेली आहे. अनेक तरुणांना रोजगार सोडून घरी बसावे लागले आहे. मुंबईकर चाकरमानही गावाकडे परतले आहेत. उदरनिर्वाहाचा सर्वात मोठा प्रश्न आवासून उभा आहे. या परिस्थितीमध्ये मग्रारोहयो योजना गावातील बेरोजगारांसाठी उपयुक्त ठरत आहे. घरकुल, शोष खड्डे, नॅडप, विहिरी यासह फळबाग लागवडीच्या कामांमधून अनेकांना रोजगाराचे साधन गावातच मिळाले आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात 1 एप्रिल ते 30 जून या कालावधीत 1 लाख 90 हजार 832 जणांना ऑनलाईन पॉर्टलवर मनुष्यदिन निर्मितीची नोंद झाली आहे. यावरुन गावात सुरु असलेल्या कामांमधून कामे करणार्यांना रोजगार मिळाला आहे. यामधून 4 कोटी 73 लाख रुपये खर्ची पडले आहेत. एक हजारहून अधिक कामे जिल्ह्यात मग्रारोहयोमधून सुरु आहेत. ग्रामीण भागातील लोकांसाठी ही योजना निश्चितच दिलासा देणारी ठरत आहे. यामध्ये 60 टक्के निधी मनुष्यदिन निर्मितीसाठी आणि 40 टक्के निधी तांत्रिक कामांसाठी खर्ची पडतो. जिल्ह्यात 5 कोटी 49 लाख रुपये खर्च झाले आहेत. गतवर्षीही या योजनेला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता ही योजना निश्चितच ग्रामीण भागातील लोकांसाठी आर्थिक हातभर लावण्यासाठी उपयुक्त ठरु शकते. दरम्यान, मग्रारोहयो योजनेतून फळबाग लागवडीला अनेक प्रस्ताव जिल्ह्यातून आलेले आहेत. सध्या पावसाने उघडीप दिल्यामुळे भातशेतीची कामे थांबली आहेत. या कालावधीत फळबाग लागवडीसाठी आवश्यक कामे करुन घेण्यासाठी आवाहन करण्यात आले आहे.









