लांजा येथे व्याजी पैसे देणाऱ्या सावकाराचा खून

लांजा:- तालुक्यातील कणगवली पेणेवाडी येथील राहणारा सीताराम सोमा सुवारे (५६) या व्याजी पैसे देणार्‍या इसमाचा खून झाल्याचा प्रकार घडला आहे. काल त्यांचा मृतदेह संशयास्पद अवस्थेत सापडला आहे. याप्रकरणी पोलिसांनी वैभव कृष्णा पवार (राहणार वेरळ), अजित गणपत गावडे (राहणार वेरळ) या संशयित आरोपी विरुध्द गुन्हा दाखल केला आहे.

सीताराम हा व्याजी पैसे देण्याचे काम करीत होता. दोन जून रोजी घरातून सकाळी भांबेड येथे जाऊन येतो असे आपल्या पत्नीला सांगून घरातून सकाळी सात वाजता बाहेर पडला होता, त्यानंतर तो बेपत्ता झाला होता. दरम्यान सीताराम बेपत्ता झाल्याची फिर्याद सीताराम यांच्या मुलाने चार तारखेला लांजा पोलीस स्थानकात केली होती. ५ जून रोजी बेपत्ता असलेल्या सीताराम यांची दुचाकी वेरळ कणगवली रोडवर जाधव यांच्या बागेजवळ सापडली होती. दरम्यान त्या ठिकाणी शोध घेतला असता गाडीपासून सहाशे मीटर अंतरावर असलेल्या दगडी गडग्याजवळ सीताराम याचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत सापडला मयत याच्या डोक्याला भुवई पासून कानापर्यंत पाच इंचाची जखम आढळून आली. तसेच त्याच्या पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये डोक्यास गंभीर स्वरूपाची दुखापत झाल्याने मयत असा अहवाल वैद्यकीय अधिकारी यांनी दिला त्यामुळे हा घातपाताचा प्रकार असल्यावरून त्यादृष्टीने पोलिसांनी तपास सुरू केला. यातील दोघा आरोपींनी पैशाच्या देवघेवीचा व्यवहारावरून सीताराम याच्या डोक्यात कोणत्यातरी हत्याराने गंभीर दुखापत करून त्याला जीवे ठार मारल्याचा संशय आहे. तसेच सीताराम यांच्या अंगावरील साठ हजार रुपये किमतीची सोन्याची चेन व रोख पस्तीस हजार रु चोरून सीताराम याचा मृतदेह घटनास्थळापासून जंगलमय भागात दगडी बांधाच्या आडोशाला टाकून दिल्याचा संशय आहे. याप्रकरणी उपविभागीय पोलिस अधिकारी सदाशिव वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस तपास सुरू आहे.