रत्नागिरीत येण्यासाठी बनावट ई-पासचा वापर; पाच जणांवर गुन्हा दाखल

रत्नागिरी:- संचारबंदीमध्ये प्रवासासाठी ई-पास आवश्यक आहे. रत्नागिरी जिल्ह्यात येण्यापुर्वी कशेडी येथे कसुन तपासणी केली जाते. या तपासणी दरम्यान रविवारी वसईतून येणार्‍या प्रवाशांवर बनावट पासप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. तर नऊ दिवसांपुर्वी असाच प्रयत्न करुन मुंबईतून रत्नागिरीत येणार्‍यांवर कारवाई केली आहे. दोन वाहनांमधील पाच जणांवर गुन्हा दाखल झाला आहे.

कोरानाचा संसर्ग वाढत असल्यामुळे आंतर जिल्हा प्रवासासाठी ई पास अत्यावश्यक आहे. त्याचा गैरफायदा घेत असल्यामुळे कसून तपासणीचे आदेश जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. मोहित कुमार गर्ग यांनी दिले आहेत. रविवारी (ता. 9) कशेडी चेक पोस्ट येथे मुंबईहुन येणार्‍या चारचाकी वाहनाची पोलीसांनी तपासणी केली. त्यांच्याकडील पास बनावट असल्याचा संशय होता. क्युआर कोडने पास स्कॅन करुनही बनावटपणा उघड झाला नाही. अखेर सायबर सेलची मदत घेण्यात आली. त्यामध्ये पास बनावट असल्याचे निष्पन्न झाले. याप्रकरणी वाहन चालक प्रशांत प्रकाश पाटील (वय 43) आणि वाहनाचे मालक व प्रवासी अंकित अनंत पडीयार (वय 23 वर्षे, रा.कस्तुरी बिल्डींग, न्यु दिवाण मान, वसई पश्चिम) यांच्याविरोधात खेड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. या प्रकरणी अधिक चौकशीत बनावट पास वाहन मालक अंकित पडीयार यांनी पालघरमधील एका व्यक्तीकडून बनवून घेतल्याचे पुढे आले. त्यासाठी 600 रुपये दिले होते. या पासवरुन संशयित आरोपी हे वसई ते हारडी (ता. राजापुर) येथे जाणार होते.

यापुर्वी 30 एप्रिलला कशेडी येथे एका चारचाकी वाहनावर कारवाई झाली होती. त्या प्रवाशांकडील पासचा क्युआर कोड स्कॅन केला होता. पण तो बनावट नव्हता. संशयावरुन सायबर सेलची मदत घेण्यात आली. त्यात बनावटपणा उघड झाला. याबाबत खेड पोलीस ठाण्यात महंमद वसीम रुफीक लालु, (रा. उद्यमनगर, रत्नागिरी), तन्वीर खुदबु काझी (रा. कोकणनगर, रत्नागिरी), अजीम अब्दुल कादीर मंगा (रा. अपराध हॉस्पीटल, गोडबोले स्टॉप जवळ रत्नागिरी) यांच्यावर गुन्हा दाखल केला. यामध्ये गाडीचे चालक महमद वसीम रफिक लालु (रा. उद्यमनगर, रत्नागिरी) यांनी मावसभाऊ तनविर कुदबू काझी यांने दिलेल्या माहीतीवरुन अजीम मंगा यांच्याकडून बनावट पास तयार घेतल्याचे पुढे आले. दोन्ही प्रकरणी पोलिस अधिकरी तपास करत आहेत.

ई पाससाठी अर्ज करताना गरजू नागरिकांनी कायदेशीर मार्गाचा अवलंब करावा. कोणत्याही अविश्वासू व्यक्तिची मदत घेऊ नये. वैध ई पासाशिवाय प्रवास करु नये, असे आवाहन जिल्हा पोलिस अधिक्षक कार्यालयाकडून करण्यात आले आहे.