रत्नागिरी:- कोरोनाचे रुग्ण वाढत असून जिल्ह्यात कडक संचारबंदी लागू करण्याचा निर्णय झाला आहे. त्यानुसार लसीकरणही वेगाने केले जात आहे; परंतू आज रविवारी (ता. 18) लसीकरण बंद ठेवण्यात येणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. सोमवारी लसीकरण पुन्हा सुरु होणार असले तरीही लसीचा तुटवडा जाणवणार आहे.
कोरोनापासून संरक्षण म्हणून प्रतिबंधात्मक कोविड लसीकरण मोहिम राबविली जात आहे. 16 जानेवारी 2021 पासून रत्नागिरी जिल्ह्यात कोविड लसीकरणाला सुरुवात झाली. आतापर्यंत आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाईन वर्कर्स आणि 45 वर्षे वयोगटावरील नागरिकांना प्राधान्य देण्यात आले आहे. सध्या जिल्ह्यात रुग्ण वाढत आहेत. जिल्हाधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्रात, उपजिल्हा रुग्णालये, ग्रामीण रुग्णालये व नागरी आरोग्य केंद्रात कोविड लसीकरण सत्रे घेण्यात येत आहेत. हे लसीकरण रविवारी (ता. 18) स्थगित करण्यात आले आहेत. सोमवारी (ता. 19) लसीच्या उपलब्ध संख्येनुसार लसीकरण सत्रे सुरु राहतील. रत्नागिरी जिल्ह्यात आतापर्यंत कोविड लसीकरणाचा 1 लाख 15 हजार 903 लोकांनी लाभ घेतला आहे. त्यामध्ये कोणालाही गंभीर व अती गंभीर स्वरुपाची लक्षणे आढळलेली नाहीत. कोविड लसीचे दोन डोस पूर्ण करणे अत्यावश्यक आहेत. लस घेतल्यामुळे आजाराची तिव्रता कमी होते आणि मृत्यूचा धोका टळतो.
लसीकरण करुन घ्या असे आवाहन प्रशासन करत असतानाच जिल्ह्यात लसीचा साठा अपुरा असल्यामुळे गोंधळ उडण्याची शक्यता आहे. दोन दिवसांपुर्वी कोव्हॅक्सीनचे सव्वा पाच हजार डोस प्राप्त झाले आहेत. ते सोमवारसाठी ठेवण्यात आले आहेत. मंगळवारी शासनाकडून लस मिळाली नाही, तर पुन्हा केंद्र बंद ठेवण्याची वेळ येणार आहे. जिल्ह्यात 112 लसीकरण केंद्र असली तरीही त्यातील अनेक केंद्रांवर लसीकरण पुर्वीच बंद ठेवली आहेत.









