लांजा : तालुक्यातील पालू बौद्धवाडी येथील ५२ वर्षीय भिकाजी रत्ना कांबळे यांच्या आत्महत्येप्रकरणी लांजा पोलिसांनी पालू बौद्धवाडी येथील दोघांवर गुन्हा दाखल केला आहे.
लांजा तालुक्यातील पालू बौद्धवाडी येथील भिकाजी कांबळे यांनी शुक्रवार ९ एप्रिल रोजी रात्री ८ च्या सुमारास राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली होती. शेजारच्या लोकांनी त्यांच्या घरी जाऊन पाहिल्यानंतर त्यांनी आत्महत्या केल्याचे आढळून आले होते. आत्महत्या करण्यापूर्वी भिकाजी कांबळे यांनी एक चिठ्ठी लिहून ठेवली होती. या चिठ्ठीत त्यांनी आपल्या आत्महत्येस वाडीतील संतोष सखाराम कांबळे आणि मिलिंद देवजी कांबळे हे दोघेजण जबाबदार असल्याचे लिहून ठेवले होते. हे दोघेजण आपल्याला नाहक त्रास देत होते. तसेच घरातून निघून जा, अन्यथा तुला ठार मारू अशी आपल्याला धमकी दिली होती. यातूनच आपले काही बरेवाईट झाल्यास या प्रकरणी या दोघांना जबाबदार धरावे, असे त्यांनी लिहून ठेवले होते. या प्रकरणी पोलिसांनी या दोघांवर गुन्हा दाखल केला आहे









