राजापूर:- तालुक्यातील बाकाळे येथे वडिलांना तसेच पत्नीला शिवीगाळ का केली अशी विचारणा केल्याच्या रागातून दोन भावांवर मासे कापण्याच्या सुर्याने वार केले.याप्रकरणी नाटे पोलिस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.ही घटना गुरुवारी सकाळी 6 वा.सुमारास घडली.
गणेश सिताराम पवार (35,रा.बाकाळे,राजापूर) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे.त्याच्याविरोधात प्रशांत प्रकाश पवार (32,रा.बाकाळे, राजापूर) यांनी तक्रार दिली आहे.त्यानुसार,गुरुवारी सकाळी प्रशांतचे वडिल आणि त्याची पत्नी शेतीची कामे आटोपून गणेशच्या घरासमोरील पायवाटेने घरी जात होते.
तेव्हा गणेशने अज्ञात कारणातून त्यांना शिवीगाळ केली.याप्रकरणी प्रशांत आणि त्याचा भाउ या दोघांनी गणेशकडे याबाबत विचारणा केली असता त्याने घरातून मासे कापण्याचा सूरा आणून प्रशांतच्या डोक्यावर आणि मानेवर उजव्या बाजुला वार केला.त्यानंतर त्याच्या भावाच्याही डोक्यावर सुरा मारुन ठार मारण्याची धमकी दिली.याप्रकरणी अधिक तपास नाटे पोलिस करत आहेत.