रत्नागिरी:- एका 65 वर्षीय वृध्दाने 5 वर्षांच्या बालिकेवर लैंगिक अत्याचार करुन पळ काढल्याची घटना महाबळेश्वर येथे घडली होती. हा वयोवृद्ध पळून गेल्यामुळे त्याची खबर डायल 112 वर रत्नागिरी पोलीसांना मिळाली. हा वयोवृद्ध सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर येथे त्याच्या नातेवाईकाच्या घरी गेला होता. त्याठिकाणी त्याने हे कृत्य केले. त्याच्याविरोधात महाबळेश्वर पोलीस ठाण्यात कलम 376 अ व तसेच बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण अधिनियम सन 2012चे कलम 4 व 10 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
पोलिसांनी तात्काळ त्या वृध्दाचा शोध घेतला. हा 65 वर्षीय वयोवृध्द खेड बसस्थानक येथे वावरत असल्याची खात्रीशीर माहिती पोलिसांना मिळाली होती. त्याला खेड पोलिसांनी ताब्यात घेतले. त्या संशयीत आरोपीला ताब्यात घेतल्यानंतर सदर माहिती महाबळेश्वर पोलिसांना कळवण्यात आली. त्या आरोपीला पुढील कारवाईकरीता महाबळेश्वर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
अशा प्रकारच्या घडणार्या गुन्ह्याची माहिती लगेचच पोलीस प्रशासनाला देण्याकरीता डायल 112 या क्रमांकाचा वापर करावा, असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी केले आहे.