जादा परताव्याचे आमिष दाखवून १३ लाखाची फसवणूक

खेड:- गृहप्रकल्पातून जादा परताव्याचे आमिष दाखवत तब्बल १३ लाख ३२ हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी मनोज आबा पवार, मिथुन आबा पवार, दीपक देवराम साळुंखे आणि राम जाधव अशा चौघांवर खेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पन्हाळजे येथील चेतन जयसिंग चव्हाण यांनी पोलिसात तक्रार दिली होती. २७ ऑक्टोबर २०१६ ते २० फेब्रुवारी २०१७ या कालावधीत ही घटना घडल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

संशयितांनी पन्हाळजे येथील स्वराज्य डेव्हलपर्सच्या (पिकॉक व्हॅली) प्रकल्पामधील गट क्र. ११२/६/३/२/५ ब क्षेत्र ११ गुंठ्यामधील रो-हाऊस / बंगला खरेदी करण्याबाबत फिर्यादी यांची मनधरणी करत त्यांचा विश्वास संपादन केला होता. या प्रकल्पातून परताव्याचे आमिष दाखवत त्यांच्याकडून २७ ऑक्टोबर २०१६ ते २०१७ या मुदतीत १३ लाख ३२ हजार रुपये स्वीकारले. परंतु बंगल्याचे काम पूर्ण न करता त्यांनी आर्थिक फसवणूक केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. तसेच विश्वासाने दिलेल्या रक्कमेतून मनोज पवार, मिथुन पवार, दीपक साळुंखे यांनी बंगल्याचे काम पूर्ण न करता दुसरीकडे १०. गुंठे जागा खरेदी करत रक्कमेचा अपहार केल्याचेही तक्रारीत म्हटले आहे. राम जाधव यानेही फिर्यादी यांची परवानगी न घेता मंजूर असलेल्या कर्जातील रक्कम परस्पर स्वराज्य डेव्हलपर्सला दिल्याचेही तक्रारीत नमूद केले आहे. त्यानुसार चौघांवर आर्थिक फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.