धाऊलवल्ली डाक खात्यात अपहार, डाकपालाविरोधात गुन्हा दाखल

राजापूर:- तालुक्यातील भारतीय डाक विभाग शाखा धाऊलवल्ली येथील खातेधारकांच्या रक्कमेचा अपहार केल्याप्रकरणी डाकपाल विजय कृष्णा भोवड (३१, रा. दसूर) याच्याविरोधात नाटे सागरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी राजापूर डाकघर निरीक्षक बालाजी हराळे यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ५ ऑगस्ट २०२० ते १६ मार्च २०२३ या कार्यकाळात भारतीय डाक विभाग शाखा, धाऊलवली येथील डाकपाल विजय भोवड याने येथील खातेधारकांच्या खात्यामधून ७१ हजार ५०० रुपये रकमेचा अपहार केल्याचे प्रथमदर्शनी निदर्शनास आले. त्यानंतर संशयित आरोपीने ७१ हजार ५०० रुपये किरकोळ सदरी जमा केले. परंतु या ७१ हजार ५०० रुपये पैकी वरील एकूण ३६ खातेधारकांच्या खात्यात एकूण ५४ हजार ५०० रुपये रक्कमेचा अपहार केल्याचे चौकशीअंती निष्पन्न झाले. भारतीय डाक विभागाच्या नियमानुसार अपहाराची रक्कम रुपये ५० हजारपेक्षा जास्त झाल्याने तक्रारदारांनी त्याच्याविरुद्ध दिलेल्या तक्रारीवरून नाटे पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंद झाला आहे.