बिबट्याची नखे तस्करी प्रकरणी 10 जूनपर्यंत पोलीस कोठडी

खेड:- मुंबई-गोवा महामार्गावर भरणे- जाधववाडी येथे चिपळूण वनविभागाने कारवाई करून जप्त केलेली बिबट्याची 8 नखे संशयितांकडून 6 लाख रुपयांना विकली जाणार होती, अशी माहिती तपासात पुढे आली आहे. बिबट्याच्या नखे तस्करीचे नेमके कनेक्शन शोधण्यात वनविभागाचे पथक गुंतले आहे. आणखी धागेदोरे हाती लागण्याची दाट शक्यता आहे. त्यादृष्टीने वनविभागाने तपासाला गती दिली आहे.

बिबट्याच्या नखे तस्करीप्रकरणी वनविभागाच्या पथकाने दिलीप सावळेराम कडलग (घाटकोपर- मुंबई), अतुल विनोद दांडेकर (चेंबूर-मुंबई), विनोद पांडुरंग कदम (सावर्डे-चिपळूण), सचिन रमेश गुरव (गोविळ-लांजा) यांच्या मुसक्या आवळल्या आहेत. त्यांच्याकडून 6 लाख रूपये किंमतीची 8 बिबट्याची नखे, एक रिक्षा व दुचाकी वनविभागाच्या पथकाने जप्त केली आहे. चारही संशयित 10 जूनपर्यंत वनविभागाच्या पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. बिबट्याच्या नखे तस्करीप्रकरणात सचिन गुरव हाच मुख्य सूत्रधार असल्याचे देखील तपासात निष्पन्न झाल्याचे समजते. या तस्करीप्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे का, यादृष्टीनेदेखील वनविभागाकडून सखोल तपास सुरू आहे. यामध्ये आणखी काही धागेदोरे वनविभागाच्या हाती लागण्याची दाट शक्यता आहे. सद्यस्थितीत बिबट्याच्या नखांच्या तस्करीप्रकरणाचे नेमके कनेक्शन शोधण्यात वनविभागाचे पथक गुंतले आहे. याबाबतचा अधिक तपास विभागीय वनाधिकारी गिरीजा देसाई, सहाय्यक वनसंरक्षक वैभव बोराटे यांच्या मार्गदर्शनाखाली दापोलीचे परीक्षेत्र वनाधिकारी प्रकाश पाटील, खेडचे वनपाल सुरेश उपरे व त्यांचे सहकारी करत आहेत.