प्रवेश शुल्कात अडीच लाखांचा अपहार; एकावर गुन्हा दाखल

चिपळूण:- कर्नाटकातील एका वैद्यकीय महाविद्यालयात प्रथम वर्ष प्रवेशासाठी दिलेल्या ६ लाख ५० हजार रुपयांच्या फीपैकी ४ लाख रुपये महाविद्यालयात भरून उर्वरित २ लाख ५० हजाराचा प्रवेश प्रक्रिया अधिकाऱ्याने अपहार केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी संजय आत्माराम कदम (४७) यांनी पोलिसात तक्रार नोंदवली असता संबंधित महाविद्यालयाचा प्रवेश प्रक्रिया अधिकारी शशीभूषण कुमार (कर्नाटक) याच्यावर चिपळूण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डिसेंबर २०२१ ते १३ मे २०२३ या कालावधीत ही घटना घडली होती.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी संजय कदम यांच्या मुलीला कर्नाटक राज्यातील बंगळुरू मल्लपुरा- नेलमंगला येथील रोझी रॉयल होमिओपॅथिक मेडीकल कॉलेज ॲन्ड हॉस्पिटलमध्ये २०२१-२२ या प्रथम वर्षासाठी लागणारे प्रवेश शुल्क चार लाख रुपये इतके होते. असे असताना शशिभूषण कुमार यांनी महाविद्यालयाचा प्रवेश प्रक्रिया अधिकारी असल्याचे सांगून कदम यांच्याकडून ६ लाख ५० हजार रुपये फोन पेद्वारे स्वीकारले. त्यापैकी चार लाख रुपये महाविद्यालयात भरून उर्वरित २ लाख ५० हजार रुपयाची रक्कम परत दिली नाही. फिर्यादी कदम यांनी शशीभूषण कुमार याच्याकडे रक्कम परत देण्यासाठी वारंवार संपर्क केला. परंतु सदर रक्कम त्याने द्वितीय वर्षाकरता कॉलेजमध्ये न भरता स्वतःच्या फायद्याकरता वापरुन त्याचा अपहार केला. हा प्रकार कदम यांच्या लक्षात येताच त्यांनी चिपळूण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.