‘आरजू’च्या फसवणुकीचा आकडा ४ कोटींच्या पार

रत्नागिरी:- रत्नागिरीकरांना करोडोंचा चुना लावणाऱ्या आरजू टेक्सोल कंपनीविरोधात शुक्रवार , ७ जूनपर्यंत ३३६ जणांचे जबाब नोंदवण्यात आले असून , फसवणुकीची रक्कम ४ कोटी १८ लाखांवर गेली आहे.

कंपनीची फसवणुकीची व्याप्ती मोठी आहे . अन्य आरोपींच्या शोधासाठी दिल्लीसह पुण्यात गेलेली पथके अजून परतलेली नसून , अन्य संशयितांचा कसून शोध घेतला जात आहे . यापूर्वी तपासाची चक्रे वेगाने फिरवून कंपनीच्या चार संचालकांपैकी संजय केळकर आणि प्रसाद फडके या दोघांना आर्थिक गुन्हे शाखेकडून अटक करण्यात आली होती .
त्यांच्या पोलिस कोठडीची मुदत संपल्याने त्यांची रवानगी आता न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे . तर अन्य दोन संचालक अद्याप फरार आहेत . या कंपनीच्या वेगवेगळ्या योजनेमध्ये रत्नागिरी बरोबरच सिंधुदुर्गातील कुडाळ तसेच सांगली , मिरज , पूणे येथील नागरिकांनीही मोठी गुंतवणूक केली आहे . पोलिसांनी आवाहन केल्यानंतर आता दिवसेंदिवस तक्रारदारांची संख्या वाढत असून आतापर्यंत ३३६ जणांचा जबाब पोलिसांकडून नोंदवण्यात आला आहे . या प्रकरणी दोन संचालकांच्या मुसक्या आवळल्यानंतर पोलिसांनी आता अन्य दोन संचालकांना अटक करण्यासाठी ठिकठिकाणी आपली पथके रवाना केली आहेत . परंतू त्यांचे मोबाईल लोकेशन सापडत नसल्याने त्यांच्यापर्यंत पोहचण्यात अडथळे निर्माण होत आहेत.