लोनच्या नादात कुवारबाव येथील मिठाई व्यावसायिकाची 11 लाख 60 हजारांची फसवणूक

रत्नागिरी:- शहरानजीकच्या कुवारबाव येथील मिठाई व्यावसायिक इन्स्टाग्रामवरील लोन मिळण्याच्या जाहिरातीला बळी पडला. यामध्ये त्यांची 11 लाख 60 हजार 674 रुपयांची फसवणूक झाली. शहर पोलिस ठाण्यात संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना 15 मार्च ते 17 एप्रिल 2024 या कालावधीत कुवारबाव परिसरात घडली आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी
राणाराम काळुराम रायका (38,रा. कुवारबाव, रत्नागिरी) यांनी मोबाईलवरील इन्स्टाग्राम अ‍ॅपवर लोन मिळेल अशी जाहिरात पाहिली. त्यावरील मोबाईलवर फोन केल्यावर त्यांना अज्ञाताने लोन मिळेल असे आमिष दाखवत त्यांचा विश्वास संपादन केला. त्यानंतर संशयिताने आपला क्युआर कोड देऊन प्रथम 5 हजार नंतर इन्शूरन्ससाठी 38 हजार रुपये गुगल पेव्दारे घेतले. त्यानंतर फिर्यादी राणाराम रायका यांनी वेळोवेळी गुगलपेव्दारे 6 लाख 23 हजार 884 आणि आपल्या दोन मित्रांच्या बँक खाते आणि एअरटेल पेमेंटव्दारे संशयिताला 3 लाख 63 हजार 290 असे एकूण 11 लाख 60 हजार 674 रुपये ऑनलाईन पध्दतीने पाठवले. ऐवढे पैसे देऊनही लोन न मिळाल्याने आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच राणाराम रायका यांनी बुधवारी (ता. ५) शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास शहर पोलिस अमंलदार करत आहेत.