पांढरा समुद्र येथे वाळू माफियांचा उपजिल्हाधिकाऱ्यांवर हल्ला

रत्नागिरी:- वाळू चोरीचे चित्रीकरण केल्याच्या संशयावरून रोजगार हमी योजनेच्या उपजिल्हाधिकारी हर्षलता धनराज गेडाम (वय 49) यांच्यावर फावड्याने हल्ला करणाऱ्या दोघांना श्रीमती गेडाम यांनीच चोप दिला. शुक्रवारी सकाळी पांढरा समुद्र येथे ही घटना घडली. वाळू माफियांनी थेट उपजिल्हाधिकाऱ्यांवर हल्ला केल्यामुळे वाळू चोरीचे प्रकरण ऐरणीवर आले आहे. श्रीमती गेडाम यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी दोघांविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. तर वाळू चोरांवर कारवाई करण्याचे आदेश तहसीलदार राजाराम म्हात्रे यांनी मंडल अधिकाऱ्यांना दिले आहेत.

जिल्हाधिकारी कार्यालयातील रोजगार हमी योजनेच्या उपजिल्हाधिकारी श्रीमती हर्षलता धनराज गेडाम या शुक्रवारी सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास रेमंड रेस्टहाऊसच्या मागील बाजुला असलेल्या मुरूगवाडा-पांढरा समुद्र किनाऱ्यावर मॉर्निंग वॉकसाठी गेल्या होत्या. किनाऱ्यावरून त्या समुद्राचे चित्रीकरण करत होत्या. याचवेळी पांढरा समुद्र येथे दोन सफेद रंगाच्या बोलेरो पिकअप गाड्या वाळू भरून जात होत्या तर एक लाल रंगाचा ट्रक मिरकरवाड्याच्या दिशेने उभा होता. त्यामध्ये काही व्यक्ती वाळू भरत होत्या.

श्रीमती गेडाम यांनी दिलेल्या तक्रारीनुसार त्या समुद्राचे चित्रीकरण करीत असताना वाळू भरणाऱ्या गाडीतील एक इसम त्यांच्या दिशेने आला. त्याने तुम्ही आमच्या गाड्यांचे फोटो का काढताय? असे विचारले. यावेळी श्रीमती गेडाम यांनी मी समुद्राचे चित्रीकरण करतेय. तुमच्या गाड्यांचे चित्रीकरण केलेले नाही. असे सांगून त्या रेस्टहाऊसच्या दिशेने पायी चालत जात असताना तिसरी सफेद रंगाची बोलेरो पिकअप गाडी आपल्याजवळ येऊन थांबली. त्या गाडीतून दोघेजण खाली उतरले. त्यांनी तुम्ही आमच्या वाळू भरलेल्या गाड्यांचे फोटो काढले आहे, चित्रीकरण केले आहे, तुमचा मोबाईल माझ्याजवळ द्या असे सांगत मोबाईल हिसकावून घेण्यासाठी तो जवळ आला असता आपण थोडे मागे येत उजव्या पायाने त्याच्या चेहऱ्यावर कराटे कीक मारल्याने तो खाली पडला. हे बघून त्याच्यासोबत असलेला दुसरा व्यक्ती गाडीतील फावडे घेऊन माझ्या अंगावर मारण्यासाठी धावत आला. मी थोडे बाजुला झाले त्यावेळी तो तसाच पुढे गेला. त्यानंतर मी त्यालाही पाठीमागून कराटे कीक मारली. तसा तोही पडला. तेथील राडा पाहून किनाऱ्यावर उभे असलेले पिकअप गाड्यांमधील काही इसम रेमंड रेस्टहाऊसच्या दिशेने धावत येत होते. यावेळी आपण रेमंड रेस्टहाऊस येथे निघून गेले. यावेळी आपल्यावर हल्ला करण्यासाठी आलेल्या गाड्यांचे फोटो काढले अस श्रीमती गेडाम यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.

श्रीमती हर्षलता गेडाम यांनी दिलेल्या तक्रारीवरून शहर पोलिसांनी भा.दं. वि.क.352, 34 नुसार दोन अनोळखी इसमांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. शहर पोलीस या दोघांचा शोध घेत आहेत.
पांढऱ्या समुद्रकिनारी खुलेआम वाळूची चोरी करणाऱ्या व्यक्तींनी थेट उपजिल्हाधिकाऱ्यांवरच हल्ला केल्यामुळे वाळू चोरट्यांचे धाडस वाढल्याचे स्पष्ट झाले आहे. पोलिसांसह महसूल यंत्रणेला वाळू चोरीचा प्रकार माहीत नाही की त्यांच्या आशिर्वादानेच वाळू चोरी सुरू आहे? असा प्रश्न निर्माण झाला आहे. आता उपजिल्हाधिकाऱ्यांवर हल्ला केल्यामुळे महसूल यंत्रणा काय करतेय? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.