प्रवासी महिलेची पर्स लांबवणाऱ्या चोरट्याला अटक

चिपळूणः– काही दिवसांपूर्वी एर्नाकुलम रेल्वेतून प्रवास करतेवेळी चोरट्याने लेडीज पर्स चोरल्याची घटना चिपळूण रेल्वेस्थानक येथे उघडकीस आली होती. याप्रकरणी त्या चोरट्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याला अटक करून त्याच्याकडून रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. रविंद्र भाऊराव चव्हाण (वाशिम) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. याबाबतची फिर्याद सिद्दाम सुरेशकिरे (32, रेल्वे सुरक्षा बल) यांनी दिली आहे.

सुजाता आनंद या 30 मे रोजी एर्नाकुलम रेल्वेतून प्रवास करत होत्या. यावेळी त्यांच्याकडे असलेली पर्स रविंद्र चव्हाण याने चोरली. त्यामध्ये रोख रक्कम 34 हजार होती. चोरीची घटना पुढे आल्यानंतर रविंद्र याला रेल्वेतील तिकिट तपासणीसाने पकडून रेल्वे पोलिसांच्या ताब्यात दिले. त्यांनी या चोरट्यास चिपळूण पोलिसांच्या ताब्यात दिले. चव्हाण याची झडती घेतली असता त्याच्याकडे सापडलेली रोख रक्कम पोलिसांनी जप्त केली असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलिस हेडकॉन्स्टेबल अतुल ठाकूर करत आहेत.