दापोली-विसापूर येथील कात उद्योगावर अखेर गुन्हा दाखल

दापोली:- सोलापूर जिल्ह्यातील सांगोला वनपरिक्षेत्रातील अवैधरित्या तोडलेले ३०१ नग खैर सापडून आल्याप्रकरणी दापोली तालुक्यातील विसापूर येथील गुरुकृपा कात उद्योगावर वनविभागाने अखेर गुन्हा दाखल केला आहे. यामुळे दुसऱ्या जिल्ह्यातून चोरटी कात विकत घेणाऱ्या दापोली तालुक्यातील कात व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहेत.

सोलापूर जिल्हयातील शासकीय जंगलातील खैर माल दापोलीतील विसापूर येथील गुरुकृपा कातभट्टीवर जप्त करण्यात आला. सोलापूर व रत्नागिरी वनविभागाने ही संयुक्त कारवाई केली. वनविभाग सोलापूरमधील सांगोला परिक्षेत्रातील मौजे शिवणे हद्दीतील शासकीय वनक्षेत्रात खैर जातीच्या वृक्षांची अवैध वृक्षतोड आढळून आली. त्या अनुषंगाने परिक्षेत्र वन अधिकारी सांगोला यांनी गुन्हा नोंद केला. अवैध वृक्षतोडीबाबत नोंद गुन्ह्याच्या अनुषंगाने तपासांतर्गत अटक करण्यात आलेल्या दत्तात्रय शि. गोडसे व मारूती वि. गळवे या संशयित आरोपींकडे अधिक चौकशी केली असता शासकीय वनक्षेत्रातील अवैध वृक्षतोडीमधील खैर लाकूड माल रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील मौजे विसापूर येथील गुरुकृषा कात उद्योग येथे आणला असल्याची माहिती निष्पन्न झाली. तपासादरम्यान मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने रत्नागिरी वनविभागातील परिक्षेत्र वन अधिकारी दापोली यांच्याशी संपर्क साधून परिक्षेत्र वनअधिकारी सांगोला व परिक्षेत्र वन अधिकारी दापोली यांनी संयुक्त कारवाई केली.

गुरुकृपा कात उद्योगातील आढळलेला खैर लाकूड माल सांगोला वनपरिक्षेत्रातील असल्याची खात्री करून गुरुकृपा कात उद्योग विसापूर येथील उपलब्ध खैर लाकूड माल जप्तीची कार्यवाही करून खैर जातीच्या लाकडाचे ३०१ नग जप्त करण्यात आले. या प्रकरणी वनविभागाने गुरूकृपा कात उद्योगावर गुन्हा दाखल केला आहे. परिक्षेत्र वन अधिकारी सांगोला यांच्याकडील तक्रारीच्या अनुषंगाने परिक्षेत्र वन अधिकारी दापोली यांनी भारतीय वन अधिनियम १९२७ चे कलम ४१ (२) (ब) व महाराष्ट्र वन नियमावली २०१४ मधील कलम ५३ अन्वये हा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी परिक्षेत्र वन अधिकारी दापोली यांच्यामार्फत पुढील तपास. चालू आहे.

सांगोला तालुक्यातील मौजे शिवणे हद्दीतील शासकीय वनक्षेत्रात खैर वृक्षांची अवैध वृक्षतोडप्रकरणी चिपळूण येथील रत्नागिरी विभागीय वनअधिकारी गिरीजा देसाई, सहाय्यक वनसंरक्षक वनविभाग वैभव

बोराटे यांच्या मार्गदर्शनाखाली सांगोलाचे परिक्षेत्र वनअधिकारी टी. व्ही. जाधव, दापोलीचे पी. जी. पाटील, वरकटे, कवठले, वनरक्षक सोलापूर वनविभाग तसेच दापोलीचे वनपाल सावंत, दळवी, मंडणगड वनपाल, वनरक्षक, वनमजूर गोडर यांनी कार्यवाही पार पाडली. लाकूड जप्त, कारखान्यालाही सील

गुन्ह्याच्या अनुषंगाने परिक्षेत्र वन अधिकारी दापोली यांच्यामार्फत पुढील तपासाकामी गुरूकृपा कात उद्योग व परिसराची कसून पाहणी केली असता तेथे खैर असोलिव किटा- १०.९०० घ.मी. व खैर सोलिव किटा- ४.६०० घ.मी. तसेच मनाई बिगर मनाई जळावू किटा- ३.७० घ.मी. तसेच प्रक्रिया करून बनवलेला तयार कात रस प्रत्येकी ४० किलो याप्रमाणे एकूण ९३ • बॅरलमध्ये आढळला. हा सर्व माल परिक्षेत्र वन अधिकारी दापोली यांनी जप्त करून गुरुकृपा कात उद्योग या कारखान्याला सील करण्यात आले आहे. तरी परिक्षेत्र वन अधिकारी दापोली यांच्यामार्फत पुढील तपास सुरु आहे.