पनोरे येथील तिघांवर प्राणघातक हल्ल्याचे कारण अस्पष्ट

संशयितास २४ एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी

रत्नागिरी:- तिघांवर कुऱ्हाड आणि पहारीने प्राणघातक हल्ला केल्या प्रकरणी आणि यातील एकाचा मृत्यू झाल्याने लांजा पोलिसांनी पनोरे येथील ‘त्या’ हल्लेखोरावर गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी घटनेतील कुऱ्हाड तसेच पहार पोलिसांनी जप्त केली आहे .मात्र हा हल्ला का केला याबाबतचे कारण स्पष्ट झालेले नाही.

तालुक्यातील पनोरे बौद्धवाडी येथील शैलेश महादेव कांबळे (वय ४५) याने गुरुवारी १८ एप्रिल रोजी रोजी दुपारी ३ च्या सुमारास पनोरे कवचेवाडी येथे जाऊन कोणतेही कारण नसताना सुरेश तुळाजी कवचे (वय ५५) यांना कुऱ्हाड आणि पहारिने बेदम मारहाण केली होती‌. अचानक झालेल्या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले. पहारीचा डोक्यात वार बसल्याने ते ओरडत असताना त्यांच्या शेजारी असलेले जानू रघुनाथ कवचे (वय ७० वर्षे) त्या ठिकाणी गेले असता हल्लेखोर शैलेश कांबळे याने जानू कवचे यांच्या डोक्यात पहारिने वार केला होता. हा वार वर्मी बसल्याने जानु कवचे जागीच कोसळले आणि त्यांचा मृत्यू झाला होता .

त्यानंतर शैलेश कांबळे याने आपल्या घरात झोपलेल्या सुरेश संभाजी कवचे (वय ६०)यांच्या घरात जाऊन त्यांच्या डोक्यात लोखंडी पहारीने वार केला होता. यामध्ये ते देखील गंभीर जखमी झाले होते. त्यानंतर कांबळे याने यशवंत रत्ना कवचे यांच्या घराबाहेर उभ्या असलेल्या दोन चार चाकी गाड्यांच्या काचा लोखंडी पहारने फोडून नुकसान केले आहे. अशाप्रकारे विनाकारण तिघांवर हल्ला करून गंभीर जखमी केले.तसेच एका व्यक्तीचा मृत्यू झाला.

या प्रकरणी पोलिसांनी शैलेश कांबळे याच्यावर भादवि कलम ३०२, ३०७ आणि ४२७ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, शैलेश कांबळे याला पोलिसांनी शुक्रवारी १९ एप्रिल रोजी दुपारी लांजा न्यायालयासमोर उभे केले असता न्यायालयाने त्याला २४ एप्रिल पर्यंत पोलिस कोठडी ठोठावली आहे. याबाबत अधिक तपास पोलीस निरीक्षक दादासाहेब घुटूकडे हे करत आहेत