माळनाका येथे चार मित्रांमध्ये तुफान राडा; एकजण गंभीर जखमी

रत्नागिरी:- शहरातील माळनाका येथील अव्दैत पेट्रोल पंपाच्या समोर चार मित्रांमध्ये किरकोळ वादातून मारहाण झाली. यात एकाला दुखापत झाली असून त्याला उपचारासाठी जिल्हा शासकिय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मारहाणीची ही घटना बुधवार 21 फेब्रुवारी रोजी दुपारी 4 वा. सुमारास घडली.

सूरज पुरुषोत्तम आडविलकर (24, रा. गावडे आंबेरे-रत्नागिरी) असे या मारहाणीत जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. त्याच्या डोक्यात दगड मारुन त्याला गंभीर जखमी करण्यात आले आहे.
जिल्हा शासकिय रुणालयात मिळालेल्या माहितीनुसार सुरज हा राजिवडा येथे बोटीवर नोकरी करतो. बुधवारी सायंकाळी तो माळनाका येथे मित्रांसमवेत असताना कोणत्यातरी अज्ञात कारणातून मित्रां-मित्रामध्ये वाद झाला. या वादाचे रुपांतर मारहाणीत झाले. यामध्ये एका मित्राने त्याच्या डोक्यात दगड मारला त्यामुळे डोक्याला गंभीर दुखापत झाली. मात्र दगड मारल्यानंतर जखमी अवस्थेत असताना इतर मित्रांनी तेथून पलायन केले. जखमी अवस्थेत आडविलकर जिल्हा शासकिय रुग्णालयात दाखल झाला त्याच्यावर उपचार सुरु आहे. या प्रकरणी सायंकाळी उशिरापर्यत शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्याची कार्यवाही सुरु होती.