पादचारी महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून पलायन

लांजा:- रस्त्याने जाणाऱ्या पादचारी महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र जबरदस्तीने खेचून मोटरसायकलने पलायन करणाऱ्या दोघा अज्ञात चोरट्यां विरोधात लांजा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना शनिवारी १० फेब्रुवारी रोजी सायंकाळी ४.३० वाजण्याच्या सुमारास वाटुळ दाभोळे मार्गावर भांबेड पवारवाडी येथे घडली आहे.

या घटनेबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सौ नम्रता चंद्रकांत कोकाटे( वय ५३ राहणार भांबेड वळणवाडी) या शनिवारी १० फेब्रुवारी रोजी सायंकाळी त्यांच्या मुलीची सासू शारदा बाळकृष्ण बागवे हिच्याकडे वाटुळ ते दाभोळे जाणाऱ्या रोडने चालत जात असताना भांबेड पवारवाडी येथे जयराम महादेव पवार यांच्या घरासमोरील काळ्या रंगाची मोटरसायकल वरुन आलेले दोघेजण रोडच्या कडेला उभे होते. यातील एका अज्ञात इसमाने नम्रता कोकाटे यांच्या पाठीमागून येऊन त्यांच्या गळ्यातील ५० हजार रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र जबरदस्तीने खेचून चोरून नेले. तर दुसऱ्या चोरट्याने त्यांच्या हातातील पर्स जबरदस्तीने खेचण्याचा प्रयत्न केला आणि त्यानंतर हे दोघेही चोरटे मोटरसायकल वरून भांबेडतेच्या दिशेने पळून गेले.

याप्रकरणी नम्रता कोकाटे यांनी लांजा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केल्यानंतर शनिवारी रात्र १० वाजता या प्रकरणी अज्ञात चोरट्यां विरोधात भा.द.वि. कलम ३९२, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे .घटनेची माहिती मिळतात उपविभागीय पोलीस अधिकारी यशवंत केडगे यांनी देखील घटनास्थळी जाऊन पाहणी केली. या चोरीच्या घटने प्रकरणी हा अधिक तपास लांजा पोलीस निरीक्षक दादासाहेब घुटुकडे हे करत आहेत.