कोल्हापूर ते रत्नागिरी एसटी प्रवासादरम्यान महिलेच्या पर्समधील ५५ हजारांचा ऐवज लांबवला

रत्नागिरी:- कोल्हापूर ते रत्नागिरी एसटी प्रवासादरम्यान महिलेच्या पर्समधील रोख रक्कम आणि सोन्याचे मंगळसूत्र असा एकूण 55 हजार रुपयांचा मुद्देमाल अज्ञाताने लांबवला. ही घटना गुरुवार 8 फेब्रुवारी रोजी दुपारी 3 ते रात्री 8 वा. कालावधीत घडली आहे.

याबाबत अर्चना सुनील मयेकर यांनी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार, गुरुवारी दुपारी त्या मुलीसोबत कोल्हापूर ते रत्नागिरी असा एसटीने प्रवास करत होत्या. रात्री 8 वा. त्या रत्नागिरी एसटी स्टॅन्डवर उतरत असताना गर्दीचा फायदा उठवत अज्ञाताने त्यांच्या पर्स मधील रोख 3 हजार आणि 52 हजार रुपयांचे 29 ग्रॅम वजनाचे मंगळसूत्र असलेले पाकीट लांबवले.आपले पाकीट चोरीस गेल्याचे लक्षात येताच त्यांनी शुक्रवारी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. याप्रकरणी अज्ञाताविरोधात भादवी कायदा कलम 379 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.गेल्या तीन चार दिवसांमधील एसटी चढताना महिलेच्या पर्समधील ऐवज लांबावण्याची ही दुसरी घटना असून पोलिसांपुढे आरोपीला पकडण्याचे आव्हान उभे राहिले आहे.