रत्नागिरी शहरात अवैध दारुची विक्री; दोघांविरुद्ध गुन्हा

रत्नागिरी:- शहरातील आदिनाथ नगर-नाचणे व बेलबाग येथे विनापरवाना हातभट्टीची दारु विक्रीवर पोलिसांनी कारवाई केली. या कारवाईत संशयितांकडून एकूण दहा लिटर दारु जप्त केली. शहर पोलिस ठाण्यात दोघा संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सचिन विजय शिरवडकर (वय ४३) व मोहंमद अब्बास मुकादम (वय ४७, रा. अजमेरीनगर, रत्नागिरी) अशी संशयितांची नावे आहेत. या घटना गुरुवारी (ता. ८) सायंकाळी सातच्या सुमारास आदीनाथ नगर-नाचणे समोरील झोपडपट्टी
मागील जंगलमय भागात तर बेलबाग येथे घराच्या समोर मोकळ्या जागेत निदर्शनास आल्या.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी केलेल्या कारावाईत संशयितांकडे विनापरवाना एकूण ५४५ रुपयांची १० लिटर हातभट्टीची दारु सापडली. या प्रकरणी पोलिस हेड कॉन्स्टेबल राहूल जाधव व पोलिस नाईक वैभव नार्वेकर यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास शहर पोलिस अमंलदार करत आहेत.