राजापूर गोळीबार प्रकरणी संशयितांना पोलीस कोठडी

राजापूर:- अवैध मद्य वाहतुकीवर कारवाई करणाऱ्या पोलीसांवर गोळीबार केल्याप्रकरणी पोलीसांनी अटक केलेल्या त्या तीनही संशयित आरोपींना गुरूवारी राजापूर न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्यांना 10 सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

या प्रकरणातील अन्य चार ते पाच जणांचा सहभाग असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. तर या संशयीत आरोपींनी गुन्ह्याकामी वापरलेली एक स्वीप्ट कार व अन्य साहित्य जप्त करण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक भरत धुमाळ यांनी दिली आहे. अवैध मद्य वाहतुकीच्या गाडयांना संरक्षण पुरविण्याचे काम ही टोळी करत असल्याची माहीती पोलीस तपासात पुढे आली आहे.

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने राजापूर तालुक्यातील कोंड्ये येथे मुंबई-गोवा महामार्गावर सापळा रचून दारू वाहतूक करणारा ट्रक पकडल्यानंतर मागून दोन चारचाकी वाहनातून आलेल्या आठ जणांच्या टोळक्याने पोलिसांना कारवाई करण्यास अटकाव करत गोळीबार करून दारू वाहतूक करणाऱ्या ट्रकचालकाला घेवून पलायन केल्याची थरारक घटना मंगळवारी मध्यरात्री घडली होती.

दरम्यान दारू वाहतूक करणाऱ्या ट्रकचा चालक व गोळीबार करणारे सोलापूर येथील असल्याची माहिती समोर आली असून संबंधित चालक व त्याचे दोन साथीदार याला बांदा चेकपोस्ट येथे पोलिसांनी ताब्यात घेतले होते. यामध्ये शेखर नेताजी भोसले, प्रविण पर्रशुराम पवार व रमेशकुमार मंगलदात चौधरी यांचा समावेश आहे. या तीघांनाही गुरूवारी राजापूर न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्यांना 10 सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.