पाच महिन्यानंतरही कोतवडेतील वृद्धाचे खुनी मोकाटच

रत्नागिरी:- तालुक्यातील कोतवडे येथील प्रौढाच्या मारेकऱ्याला अटक करण्यात अद्यापही ग्रामीण पोलिसांना यश आलेले नाही. दगड घालून खून झालेल्या प्रौढाच्या खुनाला पाच महिने झाले तरी कोणतेही धागेदोरे पोलिसांच्या हाती लागलेले नाहीत. दिलीप रामचंद्र रामाणे (वय ५८, रा. कोतवडे, लावगणवाडी) असे खून करण्यात आलेल्या प्रौढाचे नाव आहे.

रामाणे यांचा रक्ताने माखलेल्या स्थितीत मृतदेह १७ मार्च २०२३ सायंकाळी कोतवडे कुंभारवाडी येथे आंब्याच्या बागेत आढळला होता. रामाणे यांची पत्नी दर्शना यांनी दिलेल्या फिर्यादीवरून, पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला होता; मात्र खून नेमका कुणी केला, याबाबतची उत्तरे पोलिसांना मिळू शकली नाहीत. तपासात पोलिसांनी गावातील प्रत्येक घराघरात जाऊन कसून तपास केला. त्याचा कुणाशी वाद अथवा पैशाचा व्यवहार होता का, याबाबत चौकशीही केली. मागील ३ महिन्यात ग्रामीण पोलिस व स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस अधिकारी व अंमलदार हे कोतवडे परिसरात चौकशी करत आहेत.