शर्टावरील ‘राज मुंबई’ ने खोलला खुनाचा राज

जातीवरून वादात काढला मित्राचा काटा; आरोपीना बेड्या

संगमेश्वर:- तिघा मित्रांची जेवणाची पार्टी रंगली. या पार्टीत जातीचा विषय आला आणि पार्टीचा रंगच बिघडला. जातीचा वाद वाढत गेला आणि एका मित्राने दुसऱ्या मित्राच्या डोक्यात लाकडी दांडक्याने फटका मारला. गंभीर जखमी अवस्थेतील मित्राला गाडीतून फिरवले आणि मृत झाल्यावर आंबा घाटात फेकून दिले. मात्र तब्बल चार महिन्यांनी त्या मृताच्या अंगावरील शर्टवर असलेल्या लोगोने त्या मृताच्या मारेकऱ्यांपर्यंत पोचण्याचे कठीण काम पोलिसांनी केले आहे.

प्रकाश भोवड (रा. देवराई लांजा) असे या घटनेत मृत व्यक्तीचे नाव आहे. तर  रुपेश दयानंद कोत्रे ( रा. लांजा शेवरवाडी ) आणि सतिश चंद्रकांत पालये ( रा. कोंडये, पालयेवाडी) या दोघांना या खुन प्रकरणात अटक करण्यात आली आहे. यातील सतीश पालये हा सराईत गुन्हेगार असून त्याच्या विरोधात 14 गुन्हे दाखल असून तो सध्या तडीपार आहे. 
 

या प्रकरणी देवरुख पोलीस स्थानकात 12 मार्च रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. यातील मयत अनोळखी इसम यास अज्ञात आरोपीने अज्ञात हत्याराने अज्ञात स्थळी जिवे ठार मारून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह रत्नागिरी कोल्हापूर मार्गावरील आंबा घाटातील चक्रीवळणाजवळचे दरीत टाकून दिला असा गुन्हा अज्ञात आरोपीविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला होता.
 

अज्ञात मृतदेहाबाबत सांगली, सातारा, कोल्हापूर, पुणे व मुंबई तसेच कर्नाटक, विजापूर येथे शोध घेण्यात आला. मयताची ओळख पटविण्यासाठी एकही पुरावा नसताना आशेचा एकच किरण होता तो म्हणजे मृताच्या अंगावर असलेल्या शर्टवरील राज मुंबई असा लोगो. “राज मुंबई” या टेलरचा शोध घेण्याच्या अनुषंगाने तपास करण्यात आला. त्याकरीता त्याची तपासयादी जास्तीत जास्त लोकांना समजण्याकरीता सामाजिक माध्यमांचा वापर करून त्यावर ती यादी व्हायरल करण्यात आली. 
 

दरम्यान वरिष्ठांच्या मार्गदर्शनाप्रमाणे पोलीस निरीक्षक निशा जाधव, सहाय्यक पोलीस निरीक्षक तुषार पाचपुते, सहाय्यक पोलीस निरीक्षक शरद पवार यांनी जिल्हयातील रत्नागिरी व आजुबाजुच्या सर्व पोलीस ठाण्यामध्ये पोलीस पाटील यांची मिटींग घेवून त्यांना अज्ञात मयत इसमाचा शोध घेण्याचे आवाहन केले व त्यांचेकडील मुंबई व इतर चाकरमान्यांचे ग्रुपवर प्रसिध्दी देण्याकरीता व्हायरल करण्याच्या सुचना दिल्या. याच मुदतीत दिनांक १० जुलै रोजी लांजा पोलीस ठाणे येथे पोलीस पाटील यांची मिटींग घेवून सुचना दिल्या व नापता व्यक्तींबाबत कोणाची तक्रार असल्यास ते कळविणेबाबतचे आवाहन केले. यावेळी महत्वाची माहिती समोर आली. मृताच्या अंगावरील असणारा शर्ट इसम प्रकाश भोवड ( रा . देवराई लांजा)  याचा असल्याचे समोर आले. प्रकाश भोवड याचे नातेवाईकांना बोलावून फोटो दाखविला असता त्यांनी सदर मयत इसम प्रकाश भोवड असल्याचे ओळखले आणि यावरून मयताची ओळख पटली. मरणाअगोदर प्रकाश भोवड कोणासोबत होता याचा शोध घेत असताना त्याचे दोन मित्र असल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांचा लांजा येथे शोध घेवून त्यांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्या चौकशीत प्रकाश भोवड यांचा खून झाल्याचे निष्पन्न झाले. 4 मार्च रोजी रात्री मयत प्रकाश भोवड आणि दोन आरोपी मित्र यांनी एकत्र जेवणाची पार्टी केली. त्यावेळी त्यांची आपसात मराठा व कुणबी जातीवरून वादावादी झाली. त्याचा राग येवून आरोपी रुपेश दयानंद कोत्रे याने त्याचे डोक्यात लाकडी दांडक्याने फटका मारून त्यास गंभीर जखमी केले. त्यानंतर त्यास आरोपी सतिश चंद्रकांत पालये याच्या मदतीने स्वतःचे चारचाकी गाडीत घालुन दोघांनी लांजा परिसरात गाडीतून फिरविले व त्यास तो मयत झाल्यावर प्रेताची विल्हेवाट लावणेकरीता त्याचे प्रेत आंबा घाटातील चक्रीवळणाचे दरीत टाकून देवून त्याचे खिशातील मोबाईल वस्तू दरीत टाकून देवून पुरावा नष्ट करण्याच्या प्रयत्न केला.
 

या खून प्रकरणातील दोन्ही आरोपीना अटक करण्यात आली आहे. पोलीस अधीक्षक प्रविण मुंढे, अपर पोलीस अधीक्षक विशाल गायकवाड, उपविभागीय पोलीस अधिकारी निवास साळोखे यांचे मार्गदर्शनाखाली गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक निशा जाधव यांनी केला असून तपासकामी सहाय्यक पोलीस निरीक्षक तुषार पाचपुते, सहाय्यक पोलीस निरीक्षक शरद पवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक चौधर, पोहेकॉ भुजबळराव, पोना बरगाले, पोना तडवी पोना जोयशी व देवरुख पोलीस ठाण्याचा स्टाफ यांचे सहकार्याने मदतीने उघडकीस आणलेला आहे.