लॉकडाऊनमध्ये रत्नागिरीत पकडला गोवा बनावटीचा मद्यसाठा 

रत्नागिरी:- लॉकडाऊनच्या कालावधीत रत्नागिरी शहरातील मांडवी येथे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी कारवाई करत 49 हजार 400 रुपये किंमतीचा गोवा बनवटीचा मद्यसाठा जप्त करण्यात आला आहे. मद्यसाठ्यासह एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. 
 

राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक डॉ. तडवी यांचे मार्गदर्शनाखाली निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क रत्नागिरी शहर या कार्यालया मार्फत रत्नागिरी शहरामध्ये लॉकडाउन कालावधीत कडक गस्त घालण्यात येत आहे. गस्त घालत असताना मांडवी सदानंदवाडी येथे अरविंद भिवाजी चौघुले (वय ६४ रा. मांडवी, सदानंदवाडी) हा इसम गोवा बनावटीच्या विदेशी मदयाची विक्री करताना मिळून आला. सदर इसमाच्या ताब्यात रुपये 49 हजार 400 रुपये किंमतीचा मद्यसाठा जप्त करण्यात आला आहे. दारुबंदी गुन्हयातील मुद्देमाल जप्त करून आरोपीत इसमास अटक करण्यात आली आहे.
 

अटक केलेल्या आरोपीने गोवा राज्यातील विदेशी मद्याची सध्या लॉकडाऊनमध्ये जादा किंमतीने विक्री करण्याच्या उद्देशाने स्वतःजवळ साठवणूक केल्याचे दिसून आले. सदर कारवाई निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क रत्नागिरी शहर विभागाचे निरीक्षक श्री. पांडुरंग पालकर, दुय्यम निरीक्षक किरण पाटील , भरारी पथक रत्नागिरी सहाय्यक दुय्यम निरीक्षक विजय हातिसकर, जवान नि वाहनचालक मलिक धोत्रे व विशाल विचारे, जवान वैभव सोनावले व मानस पवार यांनी केली.