होंडा शोरूम मधील तीन कर्मचाऱ्यांकडून अडीच लाखांचा अपहार

रत्नागिरी:- रत्नागिरीतील होंडा शोरूम मधील तिघा कर्मचाऱ्यांनी मिळून तब्बल सव्वा दोन लाख रुपयांचा शोरुम मध्ये अपहार केला आहे. ही बाब उघड होताच राजेंद्र केशव जोशी यांनी दिलेल्या तक्रारी वरून चेतन दुडये, स्वप्नाली पवार आणि प्रणय दत्ताराम शेलार ( सर्व रा. रत्नागिरी) यांच्या विरोधात शहर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

तिघा संशयित आरोपींनी मिळून सुमारे सव्वा दोन लाखाच्या बॅटऱ्या, मोटरसायकल आणि स्कूटरच्या ॲक्सेसरीज आणि स्पेअर पार्ट यांचा अपहार केल्याची तक्रार शोरूमचे चालक राजेंद्र केशव जोशी यांनी शहर पोलीस स्थानकात केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रत्नागिरी शहरानजीकच्या साळवी स्टॉप येथील होंडा दुचाकी शोरूम एक्साइड कंपनीच्या ४२ बॅटऱ्या, टाटा कंपनीच्या १८ बॅटऱ्या आणि मोटार सायकल, स्कुटरच्या ऍक्सेसरीज, स्पेअरपार्ट या गोष्टी शोरूम मधील पीडिआय विभागाचे प्रमुख चेतन दुडये, स्वप्नाली पवार तसेच स्पेअर पार्ट विभागातील पीकर प्रणय दत्तात्रय शेलार यांच्याकडे सोपविण्यात आले होते.मात्र त्यांनी ५ मे २०२० ते २९ जून २०२० या कालावधीमध्ये या वस्तूंचा अपहार केला असल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे. हि तक्रार ३० जुन २०२० श्री. जोशी यांनी केल्यानंतर शहर पोलीस स्थानकात या तिघा कर्मचाऱ्यांविरुद्ध भा. द. वि. कलम ४०८,३४ अन्व्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.