दापोली:- जिल्हात सर्वत्र संचारबंदी असताना गिम्हवणे येथील हॉटेल कोहिनूर हायवे या बंद हॉटेलमध्ये सुमारे एक लाख 83 हजार रुपयांची रोकड तिजोरीतून चोरून नेल्याची तक्रार या हॉटेलचे व्यवस्थापक रवींद्र शिगवण यांनी दापोली पोलिस ठाण्यात दाखल केली होती मात्र ही तक्रार दाखल करतानाच पोलिसांना तक्रारदार शिगवण यांचा संशय आला व त्यांनी शिगवण याचीच चौकशी केली असता शिगवण यांनीच आपणास ही चोरी केली असल्याचे कबूल केल्याने चोरीचा हा बनाव उघड झाला असून यामुळे दापोलीत खळबळ उडाली आहे.
याबाबत दापोली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार
दापोली हर्णे मार्गावर असलेल्या हॉटेल कोहिनूर हायवे सध्या लॉकडाऊन मुळे बंद आहे 26 मार्च रोजी रात्री 8.30 ते 27 मार्च रोजी सायंकाळी 4:30 वाजण्याच्या दरम्यान अज्ञात इसमाने हॉटेलच्या मागील दरवाज्याच्या वरील काच फोडून आत प्रवेश करून दरवाज्याची कडी काढून हॉटेलच्या काउंटर मधील रोख 16 हजार तसेच तिजोरी मधील रोख रुपये 1 लाख 67 हजार असे 1 लाख 83 हजार रुपये चोरून नेल्याची तक्रार हॉटेलचे व्यवस्थापक रवींद्र शिगवण यांनी दापोली पोलिस ठाण्यात दाखल केली.
ही तक्रार दाखल करत असतानाच दापोली पोलिसांना रवींद्र शिगवण यांचाच संशय आला तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी शिगवण यांची उलट तपासणी करण्यास सुरुवात केली असता शिगवण यानेच आपणच ही चोरी केली असल्याचे दापोली पोलिसांकडे कबूल केले. शिगवण यांचा चोरीचा हा बनाव फसला असून दापोली पोलिसांनी तक्रार दाखल झाल्या झाल्या या गुन्ह्याचा तपास केला आहे. चोरीच्या या घटनेमुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे.
गिम्हवणे येथील हॉटेल कोहिनुर हायवे हे मुंबई येथील प्रख्यात उद्योजक कै. माधवराव कोकणे यांचे आहे. याप्रकरणातील संशयीत व फिर्यादी रवींद्र शिगवण हा कोरोना चा संशयित रुग्ण असल्याने पोलिसांनाही तपास करताना सावधगिरी बाळगून तसेच अंतर राखून तपास करावा लागत आहे.या चोरीचा तपास पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांचे मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक कांबळे करत आहेत.