15 ते 18 वयोगटातील मुलांच्या लसीकरणाचा 3 जानेवारीला श्रीगणेशा

रत्नागिरी:- शासनाच्या सुचनेनुसार रत्नागिरी जिल्हयात 15 ते 18 वर्ष वयोगटाच्या मुलांचे लसीकरण 3 जानेवारीपासुन सुरु होणार आहे. या वयोगटातील 71 हजार 744 लाभार्थ्यांना लस देण्यात येणार आहे. वयोगटाच्या लसीकरणासाठी कोव्हॅक्सीनचा वापर केला जाणार आहे, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये यांनी दिली.

कोविड महामारीच्या प्रतिबंधासाठी 16 जानेवारीपासुन लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. सुुरुवातीला फ्रंटलाइन कर्मचार्‍यांना लस देण्यात आली. वर्षभरात जिल्ह्यातील 18 वर्षांवरील 10 लाख 8 हजार 964 नागरीकांचा पहीला डोस आणि 6 लाख 63 हजार 438 नागरीकांना दुसरा डोस देण्यात आला आहे. अद्याप 73 हजार 693 जणांनी पहिला डोस घेतलेला नाही. त्यांच्यासाठी आरोग्य विभागाकडून आवाहन केले जात आहे. ओगायक्रॉनचा प्रादुर्भाव देशामध्ये वेगाने होत आहे. लोकांच्या सुरक्षीततेसाठी शासनाने 15 ते 18 वर्षे वयोगटातील म्हणजेच 2007 पुर्वी जन्मलेल्या लाभार्थींना कोव्हॅक्सीनची लस दिली जाणार आहे. लसीकरणासाठी 1 जानेवारी 2022 पासून ऑनलाईन नावनोंदणी सुविधा उपलब्ध केली आहे. या वयोगटातील लाभार्थ्यांचे लसीकरण केंद्रे निश्चित करण्यासाठी स्थानिक पातळीवर आरोग्य केंद्रांना सूचना देण्यात आल्या आहेत. या वयोगटातील 71 हजार 744 लाभार्थी आहेत. त्या सर्वांना लस देण्यात येणार आहे. लसीकरणाच्या नियोजनाकरीता आरोग्य विभागातील कर्मचार्‍यांना ऑनलाईन प्रशिक्षण दिले आहे.