रत्नागिरी स्थानकात मुलगी ताब्यात; रेल्वे पोलीस, ग्रामीण पोलिसांची कारवाई
रत्नागिरी:- लग्नाचे आमिष दाखवून १३ वर्षीय अल्पवयीन मुलीला रेल्वेतून पळवून नेणार्या प्रियकराचा बेत रेल्वे पोलिसांनी हाणून पाडला आहे. शौचालयात लपवून ठेवलेल्या मुलीला मोठ्या शिताफीने पोलिसांनी बाहेर काढले. मात्र या कारवाईदरम्यान प्रियकरासह त्याचे नातेवाईक रत्नागिरी रेल्वे स्थानकातून पसार झाले. ताब्यात घेतलेल्या मुलीला सध्या ग्रामीण पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
एका अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेण्याचा प्रकार ग्रामीण पोलिसांसह रेल्वे पोलिसांनी केलेल्या कारवाईत उघडकीस आला. या मुलीला रेल्वेतून पळवून नेण्यात येत होते. मात्र केरळ पोलिसांनी कोकण रेल्वे पोलिसांशी संपर्क साधला आणि रत्नागिरीत त्या अल्पवयीन मुलीला पोलिसांनी ताब्यात घेतले. मात्र या कारवाईदरम्यान विकी नामक प्रियकर व त्याचे साथीदार संधी साधून रत्नागिरी रेल्वे स्थानकातून पळून गेले.
रेल्वे पोलिसांना मडगाव येथील रेल्वे सुरक्षा दलाकडून एका अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिला एर्नाकुलम एक्स्प्रेसमधून पळवून नेले जात आहे, अशी माहिती रत्नागिरी पोलिसांना मिळाली. त्यानुसार रेल्वे पोलिसंानी ही माहिती ग्रामीण पोलीस निरीक्षक विनित चौधरी यांना दिली.
ही माहिती मिळताच ग्रामीण पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक विनित चौधरी हे आपल्या सहकार्यांसह रत्नागिरी रेल्वे स्थानकात दाखल झाले. एर्नाकुलम एक्स्प्रेसची माहिती घेऊन या गाडीची रत्नागिरीत कसून तपासणी करण्याचा निर्णय चौधरी यांनी घेतला आणि त्यानंतर रेल्वे पोलिसांच्या मदतीने पुढील प्लॅन आखला.
पोलीस निरीक्षक विनित चौधरी यांनी रेल्वे पोलीस व ग्रामीण पोलीस यांचे संयुक्त पथक तयार करून या पथकाची तीन भागात विभागणी केली. ज्या प्लॅटफार्मवर ही ट्रेन येणार होती त्या प्लॅटफॉर्मवर दिलेल्या सुचनेप्रमाणे हे पथक थांबले होते.
सोमवारी दुपारी ३.५० वाजण्याच्या सुमारास ट्रेन क्रमांक ०६३३८ एर्नाकुलम ओखा एक्स्प्रेस रत्नागिरी रेल्वे स्थानकात दाखल झाली. ही ट्रेन प्लॅटफॉर्म क्र. २ वर आल्यानंतर तपासणीला लागलीच सुरूवात झाली.२ ते ३ वेळेस प्रत्येक डब्याची तपासणी केली परंतु, त्यांच्यापैकी कोणीही सापडले नाही.
एखाद्या स्टेशनवर ट्रेन किती वेळ थांबणार याच्या वेळेची निश्चिती ठरलेली असते. त्यामुळे जास्तकाळ ट्रेन परवानगीशिवाय थांबविता येत नाही. मात्र मुलीचा शोध घ्यायचा होता. त्यामुळे ट्रेन थांबविणे गरजेचे होते. त्यानुसार असिस्टंट ट्रॅफिक मॅनेजर यांच्यासह रत्नागिरी स्टेशन मास्तर यांना संबंधित ट्रेन आणखी थोडावेळ थांबविण्याची विनंती पोलिसांनी केली.
पोलिसांनी केलेल्या विनंतीनंतर एर्नाकुलम ओखा एक्स्प्रेस तब्बल १९ मिनिटे जादा वेळेकरीता रत्नागिरी रेल्वे स्थानकात थांबविण्यात आली. एवढा वेळ ट्रेन का थांबली हे इतर प्रवाशांना काहीच माहित नव्हते. अनेकांनी माहिती घेण्याचा प्रयत्न केला परंतु नेमके काय चाललेय हे कोणालाच कळत नव्हते.
मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी रेल्वेत झाडाझडती घेण्यास सुरूवात केली. मात्र पोलिसांच्या हाती काहीच लागले नाही. याचवेळी पोलिसांनी डी-१ या डब्यामध्ये पुन्हा प्रवेश करून त्या मुलीचा फोटो प्रवाशांना दाखविला. त्यावेळी एका महिलेने त्या मुलीला ओळखले. ही मुलगी आपल्याच डब्यात होती असे सांगितले आणि पुन्हा शोधाशोध सुरू झाली.
त्यानंतर त्या डब्याची पूर्ण झाडाझडती घेण्यात आली. त्याचदरम्यान डब्यातील उजव्या बाजूचे शौचालय बंद होते. आवाज दिल्यानंतररही ते उघडले गेले नाही, कारण ते आतून बंद होते. त्यामुळे पोलिसांना थोडा संशय आला. शौचालयातच काहीतरी गडबड आहे याची खात्री पटली.
शौचालयाच्या डब्यात कोणीतरी आहे मात्र जाणीवपूर्वक दरवाजा उघडत नाही हे पोलिसांच्या लक्षात आले. त्यानंतर पोलिसांनी शौचालयाचा दरवाजा उघडला आणि शौचालयात लपवून ठेवलेल्या त्या १३ वर्षीय मुलीला तेथून बाहेर काढले. जो फोटो रेल्वे पोलिसांना प्राप्त झाला होता तीच मुलगी शौचालयात मिळून आली.
तब्बल १९ मिनिटे जादा वेळ ओखा एक्स्प्रेस रत्नागिरी रेल्वे स्थानकात थांबविण्यात आली. या दरम्यान पोलिसांनी कारवाई फत्ते केल्यानंतर ही ट्रेन पुढील प्रवासासाठी रवाना करण्यात आली. बरोबर ४ वाजून १४ मिनिटांनी ही ट्रेन रत्नागिरी रेल्वे स्थानकातून रवाना झाली.
ज्या अल्पवयीन मुलीला फूस लावून पळविण्याचा प्रयत्न झाला ती मंडळी पोलिसांची शोधमोहिम सुरू झाल्यानंतर रत्नागिरी रेल्वे स्थानकावर पोलिसांची नजर चुकवून उतरली आणि तेथून लागलीच पसार झाली. विकी नावाचा तो तरूणदेखील पोलिसांच्या हाती लागला नाही.
या मुलीकडे चौकशी केल्यानंतर ती मुलगी समाधानकारक उत्तरे देत नव्हती. त्यानंतर रेल्वे पोलिसांनी कन्नूर पोलिसांशी संपर्क केला असता विकी नामक तरूणाने लग्नाचे आमिष दाखवून तिला राजस्थानला पळवून नेत असल्याची माहिती दिली.
या अल्पवयीन मुलीची चौकशी करून ही मुलगी ताब्यात घेतली असल्याची माहिती कन्नूर पोलिसांना देण्यात आली. मात्र कन्नूर पोलीस येईपर्यंत वेळ लागण्याची शक्यता असल्याने या मुलीला सर्व कायदेशीर बाबी पूर्ण करून ग्रामीण पोलिसांच्या हवाली करण्यात आले आहे.
ही कारवाई ग्रामीण पोलीस निरीक्षक विनीत चौधरी, रेल्वे सुरक्षा बलाचे निरीक्षक अजित मधाळे, उपनिरीक्षक श्रीमती प्रतिभा साळुंके, सहाय्यक उपनिरीक्षक आर.एस. खांडेकर, प्रधान आरक्षक दिपक टिंगरे, आरक्षक पांडुरंग उप्पलवाड यांच्यासह ग्रामीण पोलीस स्थानकाचे पोलीस नाईक संदीप काशिद, वैभव मोरे, श्रीमती सुजाता रेवाळे, श्रीमती अमिता पाटील, सुदेश शिंदे आदींनी केली.