ॲप डाऊनलोड करण्याच्या बहाण्याने प्रौढाची 63 हजारांची ऑनलाईन फसवणूक

रत्नागिरी:- अज्ञात क्रमांकावरून फोन करून एक ॲप डाऊनलोड करण्यास सांगून प्रौढाची सुमारे 63 हजार 205 रुपयांची ऑनलाईन फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना शुक्रवारी रात्री 9.37 वा. सुमारास घडली.

याबाबत सुहास शंकर विद्धावांस(55, रा. दत्तात्रय अपार्टमेंट, फाटक हायस्कूल, रत्नागिरी ) यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार, शुक्रवारी रात्री त्यांनी डॉमिनोज दुकानातुन ऑनलाईन आईसक्रीमची ऑर्डर दिली होती. थोड्यावेळाने त्यांना अज्ञाताने फोन करून फोन टू एसएमएस ॲप डाउनलोड करण्यास सांगून ओटीपी नंबर मागून घेतला. काहीवेळाने त्यांच्या बँक खात्यातून 63 हजार 205 रुपये काढण्यात आल्याचा मेसेज आल्यावर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच सुहास विद्धावांस यांनी शहर पोलिसांकडे तक्रार दिली. अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय जाधव करत आहेत.